कोची : क्रिकेटपटू श्रीशांतच्या (Sreesanth) कोचीमधील घरात आग (Kochi Home Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील एक खोली जळून खाक झाली. सुदैवाने या आगीतून त्याचे कुटुंबीय बालंबाल बचावले आहेत.
कोचीमध्ये असलेल्या श्रीशांतच्या घराच्या तळ मजल्यावर आगीचा भडका उडाला. त्यावेळी श्रीशांतची पत्नी, त्याची मुलं आणि घरातील दोन नोकर पहिल्या मजल्यावर होते. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यामुळे कोणाला समजण्याआधीच ती तळ मजल्यावरील हॉल आणि बेडरुममध्ये पसरली.
शेजाऱ्यांनी धूर पाहून अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी पहिल्या मजल्यावरील काचेचे दरवाजे तोडून कुटुंबीयांची सुटका केली. सुदैवाने घरातील कोणालाही इजा झालेली नाही. आगीत एक बेडरुम जळून खाक झाल्याची माहिती आहे.
आग लागली त्यावेळी श्रीशांत घरात नव्हता. आगीच्या घटनेविषयी समजल्यावर त्याचाही भीतीने थरकाप उडाला. मात्र कुटुंबीयांची खुशाली समजल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.
श्रीशांतवरील बंदी उठली
IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला श्रीशांतला अखेर BCCI कडून मंगळवारी दिलासा मिळाला. लोकपाल डी. के. जैन यांनी त्याच्यावरील आजीवन बंदी हटवली आणि सात वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली. त्यानुसार सप्टेंबर 2020 मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी संपत आहे.
श्रीशांतसाठी यावेळी पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे उघडतील. श्रीशांतने त्याला एक खास शतक साजरं करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्याचं वय आणि फिटनेस, त्याचा तापट स्वभावामुळे होणारे वादंग आणि कलंकित प्रतिमा पाहता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.