शंकर देवकुळे, सांगली : नुकतीच पुरुष गटाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra kesari) पार पडली. आज पर्यंत पुरूष गटातून महाराष्ट्र केसरी पैलवान झाले आहेत, पण आता त्याच तोडीच्या महिला गटाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Woman Maharashtra Kesari) स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन करण्याचे यजमानपद सांगली (Sangli) जिल्ह्याला मिळाले आहे. त्यानुसार लवकरच कुस्ती स्पर्धा सांगली जिल्ह्यात होणार असून या स्पर्धा आयोजन करण्याचा हिरवा कंदील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे तर्फे देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याला पहिल्यांदा यजमान पद मिळाल्यामुळं कुस्ती शौकीन अधिक खूश आहेत.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी ‘किताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्याध्यक्ष तसेच सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी माहिती दिली आहे.
या स्पर्धा सलग तीन दिवस चालणार असून राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील 45 महिला संघ सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातील संघाकडून 10 महिला कुस्तीगीर असे एकूण 450 महिला कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. तर प्रत्येक जिल्हा तालीम संघाचा एक व्यवस्थापक, एक मार्गदर्शक असे 10 जणांचा समावेश असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा पहिला बहुमान मिळाल्याची इतिहासात नोंद होणार आहे. या संदर्भात सांगली जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन माहिती देऊन चर्चा करण्यात आली आहे. तर या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे, यावेळी सांगली जिल्हा तालीम संघ चे अध्यक्ष पै नामदेवराव मोहिते,संपतराव जाधव,विलास शिंदे,प्रतापराव शिंदे,राजाराम पवार,हणमंत जाधव,विनायक पाटील हे उपस्थित होते.