“माजी क्रिकेटपटूंना फक्त मसाला पाहीजे”, केएल राहुल प्रकरणावरून गौतम गंभीरनं साधला निशाणा

| Updated on: Mar 20, 2023 | 3:17 PM

केएल राहुलच्या परफॉर्मन्सवरून गौतम गंभीरनं अप्रत्यक्षरित्या वेंकटेश प्रसादवर निशाणा साधला. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तुलना करून वेंकटेश प्रसादला खडे बोल सुनावले आहेत.

माजी क्रिकेटपटूंना फक्त मसाला पाहीजे, केएल राहुल प्रकरणावरून गौतम गंभीरनं साधला निशाणा
केएल राहुलवर कोणताच दबाव नाही? गौतम गंभीरनं माजी क्रिकेटपटूला सुनावले खडे बोल
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : भारतीय संघात प्लेईंग इलेव्हनमध्ये असलेल्या केएल राहुलवरून सध्या माजी क्रिकेटपटूंमध्ये जुंपली आहे. केएल राहुलचा कसोटी क्रिकेटमधील फॉर्म पाहता माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांने टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर केएल राहुलचा उतरता ग्राफ पाहून शेवटच्या दोन कसोटीत त्याला आराम देण्यात आला होता. इतकंच काय तर उपकर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर वनडे संघात त्याची निवड केल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. मात्र पहिल्या वनडेत विजयी कामगिरी केल्यानंतर पुन्हा कौतुक होऊ लागलं. आता याप्रकरणी गौतम गंभीरनं अप्रत्यक्षरित्या वेंकटेश प्रसादवर निशाणा साधला आहे.

“केएल राहुलची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी आहे. त्याने या स्पर्धेत 4 ते 5 शतकं ठोकली आहेत. मागच्या पर्वात तर त्याने मुंबई विरुद्ध शतक ठोकलं होतं. आम्ही हे सर्वांनी पाहिलं आहे. पण काही माजी खेळाडूंना सक्रिय राहण्यासाठी मसाला हवा असतो. त्यामुळेच ते अशी टीका करतात. पण केएल यामुळे दबावात येणार नाही.एका खेळाडूमुळे तु्म्ही सामना जिंकत नाही.”, असा अप्रत्यक्षरित्या टोला गौतम गंभीरने वेंकटेश प्रसादचं नाव घेता हाणला.

केएल राहुल लखनऊ सुपर जायन्ट्स संघाचं आयपीएलमध्ये नेतृत्तव करत आहे. गौतम गंभीर या संघाचा मेंटॉर आहे. गेल्या पर्वात लखनऊ सुपर जायन्ट्स संघ तिसऱ्या स्थानावर होता. “कसलं प्रेशर? गेल्या पर्वात लखनऊ तिसऱ्या स्थानी होतं. राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स संघात आपल्याला टफ फाईट पाहायला मिळाली.” असं गौतम गंभीरनं सांगितलं.

“केएल राहुलचं बोलायचं तर त्याच्यावर कोणतंही प्रेशर नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल या दोघांमध्ये फरक आहे. तुम्ही आंतराष्ट्रीय क्रिकेट फेल जरी ठरलात तरी आयपीएल 1000 धावा करू शकता. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 खेळाडूंना स्थान मिळते. आयपीएलमध्ये 150 पेक्षा जास्त खेळाडून निवडले जातात. त्यामुळे इथे त्याची तुलना होत नाही.”, असं गंभीरने पुढे सांगितलं.

लखनऊ सुपर जायन्ट्सचा कर्णधार केएल राहुलने मागच्या पर्वात 616 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, पहिल्या वनडेत चमकदार कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या वनडे केएल राहुल फेल ठरला. त्याला 12 चेंडूत 9 धावा करता आल्या.

केएल राहुलची कसोटी क्रिकेट कारकिर्द

केएल राहुल आतापर्यंत 46 कसोटी सामने खेळला असून त्यात 79 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. केएल राहुलने 7 शतकं आणि 13 अर्धशतकांच्या जोरावर 2624 धावा केल्या आहेत. कसोटीत 199 ही खेळी सर्वोत्तम ठरली आहे. त्याची फलंदाजी सरासरी 34.07 इतकी आहे.