मुंबई : भारताला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देणारा खरा हिरो गौतम गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय. काही निर्णय जड अंतःकरणाने घ्यावे लागतात आणि असाच एक निर्णय मी घेत आहे, असं जाहीर करत त्याने निवृत्ती घेतली.
आंध्र प्रदेशविरुद्धचा आगामी रणजी सामना हा माझ्या कारकीर्दीतील शेवटचा सामना असेल. ज्या फिरोज शाह कोटला मैदानावरुन सुरुवात केली, तिथूनच कारकीर्दीचा समारोप करत असल्याचं गौतम गंभीरने म्हटलंय. ट्वीटरवरुन त्याने ही घोषणा केली आणि फेसबुकला एक व्हिडीओ पोस्टही शेअर केली आहे.
गौतम गंभीरने 58 कसोटी सामने, 147 वन डे आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय वन डे संघातून बाहेर होता. नुकतंच त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आगामी आयपीएल मोसमासाठी रिलीज करण्यात आलं होतं. त्याचवेळी गंभीरच्या निवृत्तीचे अंदाज लावले जात होते.
गंभीरची कारकीर्द
गंभीरने भारतासाठी अखेरचा कसोटी सामना राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध 2016 मध्ये खेळला होता. 58 कसोटी सामन्यांच्या त्याच्या नावावर 4154, वन डेमध्ये 5238 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या खात्यात 932 धावा जमा आहेत. 6 डिसेंबरला दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश हा रणजी सामना त्याची अखेरची इनिंग असेल.
गंभीरने 2003 साली ढाक्यात खेळवण्यात आलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 15041 धावा आहेत, तर अ श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने 10777 धावा केल्या आहेत. शिवाय कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये दोन वेळा चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याच्याच नेतृत्त्वात केकेआरने हा मान मिळवला.
गंभीरचं अविस्मरणीय योगदान
भारताने 2011 साली जिंकलेल्या ऐतिहासिक विश्वचषकात गंभीर नसता, तर भारताचं विश्वचषकाचं स्वप्न कदाचित पूर्ण झालं नसतं. गंभीरने त्या अटीतटीच्या परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण 97 धावांची खेळी केली होती. शिवाय 2007 साली भारताने जिंकलेल्या टी-20 विश्वचषकाचाही गंभीर खरा हिरो होता.
कसोटीत सलग पाच शतकं ठोकणारा गंभीर एकमेव भारतीय फलंदाज आहे. शिवाय सलग चार कसोटी मालिकांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा करणाराही तो एकमेव फलंदाज आहे. गंभीरला 2009 साली आयसीसी प्लेयर ऑफ दी इयरचा मान मिळाला होता आणि त्याच वर्षी जुलैत त्याने रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली होती.
व्हिडीओ :