नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गंभीरवर त्याच्या कारकीर्दीत अनेक वेळा अन्याय झाला, ही प्रत्येक चाहत्याची भावना आहे आणि होती. पण आता गंभीरने स्वतःच या सर्व गोष्टींवर मौन सोडलं आहे. आपल्यावर कसा अन्याय झाला या सर्व गोष्टींवर त्याने भाष्य केलं.
‘आज तक’चं डिजीटल चॅनल ‘स्पोर्ट्स तक’च्या कार्यक्रमात गंभीर बोलत होता. भारतीय संघ व्यवस्थापनाबाबत त्याने मोठा खुलासा केला. शिवाय आपल्यावर झालेल्या अन्यायावर पहिल्यांदाच तो बोलता झाला. मला ज्या पद्धतीने कसोटी आणि वन डे संघातून बाहेर केलं, ते चुकीचं होतं. कसोटीतील खराब कामगिरीमुळे मला वन डेतूनही बाहेर केलं, ज्यामुळे प्रचंड वाईट वाटलं, असं गंभीरने सांगितलं.
बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांच्यावरही गंभीरने निशाणा साधला. कसोटी संघातून मला जेव्हा बाहेर करण्यात आलं, तेव्हा संदीप पाटील यांनी माझ्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. धावांमुळे तुला वगळलेलं नाही, असं निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितल्याचं गंभीर म्हणाला.
भारतीय संघात अनेक असे खेळाडू आहेत, ज्यांना संघातील त्यांच्या स्थानाबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नसते. पण हे सर्वच खेळाडूंसोबत होत नाही. तुमच्यावर दबाव असतो, की एखाद्या मालिकेत जर चांगली कामगिरी केली नाही तर तुम्हाला कधीही बाहेर केलं जाऊ शकतं. याचा थेट परिणाम कामगिरीवर होतो, अशी चिंताही गंभीरने व्यक्त केली.
धोनीवर गंभीर काय म्हणाला?
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 2015 च्या विश्वचषकातील योजनांवरही गंभीरने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात गंभीरची प्रमुख भूमिका होती. त्याने एकाकी झुंज देत 97 धावांची खेळी केली होती. एखादा कर्णधार विश्वचषकाच्या तीन वर्ष अगोदरच एवढ्या मोठ्या मालिकेसाठी संघ कसा तयार करु शकतो? तीन वर्षात खेळाडूंच्या फॉर्ममध्ये अनेक चढ-उतार येत असतात, असं गंभीर म्हणाला.
शिवाय धोनी आणि माझ्यात कसलेही मतभेद नाहीत, हे सांगायलाही गंभीर विसरला नाही. ही फक्त एक अफवा आहे. धोनीच्या बाबतीत माझ्या मनात काहीही नाही, असं गंभीरने स्पष्ट केलं.
संघात एक सदस्य म्हणून तुम्ही असता तेव्हा सहमती आणि असहमती या दोन गोष्टी होत असतात आणि त्या आवश्यक असतात. तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. धोनी आणि मी ड्रेसिंग रुममध्ये अनेक विस्मरणीय क्षण घालवले आहेत आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं गंभीरने स्पष्ट केलं.
“मित्रांपेक्षा जास्त शत्रू बनवलेत”
क्रिकेट करिअरविषयी कसलीही चिंता नसल्याचं गंभीरने निवृत्तीनंतर स्पष्ट केलं. शिवाय आपण मित्रांपेक्षा जास्त शत्रू निर्माण केले आहेत, त्यामुळेच मी रात्री शांतपणे झोपू शकत होतो, असं गंभीर म्हणाला. फक्त क्रिकेटमध्येच नाही, तर आपल्या समाजातही कुणाला त्यांच्यातली उणीव सांगणं आवडत नाही. आपण वास्तव पाहत नाही, आपलं स्टेटस राखण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट मला खटकते, असं गंभीरने रोखठोकपणे सांगितलं.
निवडकर्ते असो किंवा दिल्ली क्रिकेट असोसिएशन, गंभीरने सर्व मुद्यांवर भाष्य केलं. चुकीच्या गोष्टी आणि बनावटपणा मी सहन करु शकत नाही. मला अनेक जण सांगतात की मी थोडा नम्रही राहू शकतो. पण मी असं नाही केलं. मी दुश्मन बनवले आहेत, पण मी शांतपणे झोपू शकलो, असं गंभीर म्हणाला.
गंभीर आणि दिल्लीचे माजी प्रशिक्षक केपी भास्कर यांच्यात 2017 मध्ये शिवीगाळ झाली होती. भास्कर ज्युनिअर खेळाडूंचं करिअर बर्बाद करत असल्याचा आरोप गंभीरने केला होता. दिल्लीतील निवडकर्त्यांवरही गंभीरने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. कारण, दिल्लीने सलग तीन रणजी सामने जिंकल्यानंतर क्लब क्रिकेटर्सना संधी देण्याचं नियोजन निवडकर्त्यांनी केलं होतं. या सर्व गोष्टींचा प्रभाव करिअरवर पडला का? असाही प्रश्न गंभीरला विचारण्यात आला. निश्चितच याचा परिणाम झाला, पण अनुचित गोष्टी सहन करु शकत नसल्यामुळे हे सगळंही सहन करावं लागलं, असं गंभीरने सांगितलं.