मुंबई : भारताला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देणारा खरा हिरो गौतम गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय. काही निर्णय जड अंतःकरणाने घ्यावे लागतात आणि असाच एक निर्णय मी घेत आहे, असं जाहीर करत त्याने निवृत्ती घेतली. गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेटमधलं एक असं नाव, ज्याने अनेक ऐतिहासिक विक्रम तर केले, पण त्याचं श्रेय त्याला कधीही मिळालं नाही.
अनेक वर्षांनी भारतीय संघाचं विश्वविजेता होण्याचं जे स्वप्न होतं, ते तत्कालीन कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 2011 च्या विश्वचषकातील अखेरच्या षटकानंतर पूर्ण झालं. पण कुणी कल्पनाही केली नसेल, की त्या सामन्यात गौतम गंभीर नसता तर काय झालं असतं? श्रीलंकन गोलंदाजांनी त्या सामन्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज माघारी धाडले होते. पण गंभीरने धीर सोडला नाही. त्याने टिच्चून फलंदाजी केली आणि भारतीय संघाला लय मिळवून दिली.
त्या सामन्यात गौतम गंभीर विजयी समारोप करण्याच्या तयारीत असतानाच 97 धावांवर तो बाद झाला. गंभीर बाद झाला तसाच त्याची ती ऐतिहासिक खेळीही झाकोळली गेली. सामनावीराचा मानही महेंद्रसिंह धोनीला देण्यात आला. पण स्वतःला क्रिकेटसाठी आणि देशासाठी समर्पित केलेल्या गंभीरने कधीही याबाबत भाष्य केलं नाही.
2011 च्या विश्वचषकाचा किस्सा तर काही वर्षांपूर्वीचाच आहे. त्याअगोदरही जेव्हा भारताने पहिल्यांदाच 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला, तेव्हाही गौतम गंभीरला कुणालाही श्रेय द्यावं वाटलं नाही. त्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक सामन्यात गंभीरने 54 चेंडूत 75 म्हणजे संपूर्ण संघाच्या तुलनेत निम्म्या धावा एकट्यानेच केल्या होत्या. पण श्रीसंतने जेव्हा मिसबाह उल हकचा झेल घेतला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं तोच क्षण प्रत्येकाच्या लक्षात राहिला. रियल हिरो गौतम गंभीरची खेळी त्या विश्वचषकातही झाकोळली गेली.
शालेय क्रिकेटपासून संघर्ष
गौतम गंभीर आणि संघर्ष हे नातं नवं नाही. दमदार कामगिरीनंतरही गंभीरला अंडर-14 आणि अंडर-19 संघातून वगळण्यात आलं होतं. पण निराश झालेल्या गंभीरने कधीही जिद्द सोडली नाही आणि तो परिस्थितीशी लढत राहिला. त्याला जास्त काळ दुर्लक्षित करणं निवडकर्त्यांनाही जमलं नाही आणि अखेर त्याच्या स्वप्नातला दिवस 2003 साली आला. गंभीरने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केलं.
भारतीय संघात त्याने स्वतःचं मजबूत स्थान निर्माण केलं आणि 2009 साली आयसीसी प्लेयर ऑफ दी इयर होण्याचा मान मिळवला. एवढंच नाही, तर तो सलग तीन वर्ष टॉप फलंदाजांमध्ये होता.
एवढं सगळं असतानाही भारतीय क्रिकेटला गंभीरचा लवकरच विसर पडला. सलग चार कसोटी मालिकांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा करणारा गंभीर एकमेव भारतीय आहे. सलग 11 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त करणारा गंभीर जगातला दुसरा फलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज सर व्हीव रिचर्ड्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली. व्हीव रिचर्ड्स जगाला आजही ज्ञात आहेत, पण गंभीरचा हा विक्रम कुणाच्याही लक्षात राहिला नाही.
सर्वांनाच धक्का तेव्हा बसला, जेव्हा 2013 साली गंभीरला भारतीय संघातून वगळण्यात आलं. हा गंभीरसाठीही धक्का होता. पण त्याने निराश न होता लढणं सुरुच ठेवलं. आयपीएलमध्ये गंभीरने त्याच्या नेतृत्त्वाचा करिष्मा दाखवला आणि कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवलं.
…आणि पुन्हा तेच
ज्या गोष्टीसाठी गंभीर संघर्ष करत होता, तो दिवस पुन्हा एकदा 2014 मध्ये आला. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी गंभीरची निवड झाली. त्या दौऱ्यात भारतीय संघाने सपाटून मार खाल्ला होता. त्याचप्रमाणे गंभीरलाही काही खास करता आलं नाही आणि त्याला पुढच्या मालिकेतून पुन्हा डच्चू मिळाला.
त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गंभीरला संधी मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. कारण, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण त्याच्या जागी युवा खेळाडू केएल राहुलला संधी देण्यात आली आणि गंभीरची संधी पुन्हा हुकली. तरीही गंभीरने खेळण्याची जिद्द सोडली नाही. आपल्यातलं क्रिकेट अजून बाकी असल्याचं त्याने पुन्हा पुन्हा सांगितलं.
मिळेल त्या संधीचं सोनं!
गंभीरची कारकीर्द संपली असं अनेकांनी जाहीरही करुन टाकलं होतं, पण गंभीरचा संघर्ष सुरुच होता. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ वरचढ दिसत होता, पण तेव्हाच सलामीवीर फलंदाज केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आणि गंभीरसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडे झाले. त्या मालिकेत जेवढी संधी मिळाली, त्यात गंभीरने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. कारण, गंभीरकडे इतर खेळाडूंप्रमाणे सेट होण्यासाठी जास्त वेळ नव्हता. जे आहे त्यात त्याला स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान होतं.
2011 आणि 2007 सालचं गंभीरचं योगदान दुर्लक्षित केलं गेलं ही गोष्ट वेगळी. पण यापेक्षाही वाईट म्हणजे जबरदस्त फॉर्मात असूनही त्याच्यावर अनेकदा अन्याय झाला. पण त्याने आयपीएलमध्ये नेहमीच स्वतःला सिद्ध केलं. आयपीएलच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही, पण त्याने मिळेल त्या संधीचं सोनं कसं करायचं याचा आदर्श घालून दिला.
सचिन असो, सेहवाग असो किंवा गंभीर.. प्रत्येक खेळाडूला एका ठराविक वेळी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घ्यावाच लागतो. पण गौतम गंभीर क्रिकेटच्या इतिहासातील कदाचित पहिलाच खेळाडू असावा, ज्याला त्याच्या कामगिरीचं योग्य फळ आणि श्रेय कधीही मिळालं नाही.