मुंबई: टीम इंडियाचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के एल राहुल सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सध्या चहूबाजूने टीका होत आहे. याचा फटका पंड्या आणि केएल राहुल या दोघांना बसला. बीसीसीआयने हार्दिक पंड्या आणि के एल राहुलला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर ठेवलं. दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकाही वनडे सामन्यात खेळता आले नाही. त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर ठेवण्यात येणार आहे.
हार्दिक पंड्या आणि राहुलवर टीकेचा भडीमार सुरु असतानाच, क्रिकेटमधील जेंटलमन खेळाडू अशी ओळख असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने प्रतिक्रिया दिली आहे. “हार्दिक पंड्या आणि के एल राहुल प्रकरणावर इतकं रिअॅक्ट होण्याची अर्थात इतकं व्यक्त होण्याची गरज नाही”, असं द्रविडने म्हटलं.
द्रविड म्हणाला “यापूर्वी कोणत्या खेळाडूची चूक झाली नाही असं नाही, तसंच भविष्यातही चुका होणार नाहीत असंही नाही. आजच्या तरुणांना आपण कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी आपण ती एखाद्या गोष्टीवरुन अती रिअॅक्ट होणे टाळले पाहिजे, असं राहुल द्रविड म्हणाला.
हे खेळाडू वेगवेगळ्या संघातून आलेले आहेत. तुम्ही त्यांना त्यांची जबाबदारी समजवून द्यायला हवी. अडचणी नेहमीच येतील पण अशावेळी आपल्याला एकत्र येऊन त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तुम्ही यंत्रणेला शिव्या देऊ शकत नाही, असं द्रविड म्हणाला.
कर्नाटकमध्ये माझे वरीष्ठ, आई-बाबा आणि प्रशिक्षकांना पाहून मी शिकलो. ते माझे रोल मॉडल आहेत. कुणी माझ्याजवळ आलं नाही आणि मला लेक्चरही दिले नाही. शिकण्याची एक नवी पद्धत आहे, ड्रेसिंग रुममध्ये आपल्या वरीष्ठांचे निरीक्षण करा, असा सल्लाही यावेळी राहुल द्रविडने युवा खेळाडूंना दिला.