नवी मुंबई : संदिप म्हात्रे (35) नावाच्या क्रिकेटपटूचा ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवी मुंबईच्या घणसोलीत ही घटना घडली. घणसोलीत सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेत संदीप खेळत होता. खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर तो घरी गेला, मात्र घरी त्याला तीव्र ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
संदीप हा घणसोलीचा राहणारा होता. घणसोलीत सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेत संदीप गोलंदाजी करत होता. गोलंदाजी करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्याने कसबसं आपलं षटक पूर्ण केलं. त्यानंतर तो सामना अर्धवट सोडून घरी गेला. मात्र घरी त्याला तीव्र ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
संदीपचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या घरच्यांना दुख: अनावर झाले आहे. संदीपच्या मृत्यूने संपूर्ण घणसोली गावात शोककळा पसरली आहे. संदीप हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. शालेय जीवनापासूनच त्याने आपले नाव क्रिकेट क्षेत्रात गाजवायला सुरवात केली होती.
तर आज आणखी एका क्रिकेट पटूचा मृत्यू झाला. रणजीपटू राजेश घोडगे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गोव्यात घडली आहे. मडगाव येथे क्रिकेट क्लबच्या सामन्यात खेळत असताना राजेश यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मैदानातच कोसळले. त्यांना तातडीने ईएसआय रुग्णालयात व नंतर व्हिक्टर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी राजेश घोडगे यांना मृत घोषित केले.