मुंबई : देवच आता भारतीय क्रिकेटचा तारणहार ठरेल, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. ‘द वॉल’ अशी बिरुदावली मिरवणारा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) याला बीसीसीआय (BCCI) ने हितसंबंधांच्या मुद्यावरुन (Conflict of Interest) नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर ‘दादा’ने संताप व्यक्त केला.
‘भारतीय क्रिकेटमध्ये नवीन पायंडा पडताना दिसत आहे. हितसंबंधांचा मुद्दा… चर्चेत राहण्याचा उत्तम मार्ग… देवच आता भारतीय क्रिकेटला तारु शकतो. द्रविडला हितसंबंधाच्या मुद्यावरुन बीसीसीआयने नोटीस बजावली आहे’ अशा शब्दात सौरव गांगुलीने बीसीसीआयवर निशाणा साधला.
New fashion in indian cricket …..conflict of interest ….Best way to remain in news …god help indian cricket ……Dravid Gets Conflict of Interest Notice from BCCI Ethics Officer https://t.co/3cD6hc6vsv.
— Sourav Ganguly (@SGanguly99) August 6, 2019
गांगुलीचा ट्वीट कोट करत माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘खरंच? हे प्रकरण कुठल्या दिशेने जात आहे, हे समजत नाही. भारतीय क्रिकेटसाठी तुम्हाला त्याच्यापेक्षा (राहुल द्रविड) उत्तम माणूस मिळूच शकत नाही. अशा महान क्रिकेटपटूंना नोटीस पाठवणं, म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखं आहे. उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय क्रिकेटला त्यांची नितांत गरज आहे. खरंच, भारतीय क्रिकेटला देवानेच वाचवावं, असं म्हणत हरभजनने गांगुलीला दुजोरा दिला.
Really ?? Don’t know where it’s heading to.. u can’t get better person thn him for indian cricket. Sending notice to these legends is like insulting them.. cricket need their services for betterment.. yes god save indian cricket ? https://t.co/lioRClBl4l
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 6, 2019
काय आहे प्रकरण?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नॅशनल क्रिकेट अकादमीचा (एनसीए) क्रिकेट संचलन प्रमुख राहुल द्रविडला बीसीसीआयने हितसंबंधांच्या मुद्यावरुन नोटीस बजावली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीवरुन बीसीसीआयचे अधिकारी (निवृत्त) जस्टीस डीके जैन यांनी ही नोटीस पाठवली आहे.
राहुल द्रविड एनसीएचा संचलन प्रमुख असून इंडिया सिमेंट ग्रुपचाही उपाध्यक्ष आहे. इंडिया सिमेंटकडे आयपीएल फ्रँचायजी चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकार आहेत. द्रविड दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत असल्याने हितसंबंधाच्या मुद्द्याचंहे उल्लंघन आहे, असा आरोप गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.