लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषकात भारताला एकामागे एक धक्के बसत आहेत. संघातील खेळाडून वारंवार दुखापतग्रस्त होत आहेत. याआधी सलामीवीर फलंदाज शिखर धवन, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि त्यानंतर विजय शंकरही दुखापतग्रस्त झाला. या सर्व घटनाक्रमात आता भारतीय संघासाठी एक आनंदाजी बातमीही आली आहे.
दुखापतग्रस्त विजय शंकर आता पूर्ण तंदुरुस्त असल्याची माहिती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सांगितले. बुधवारी सराव सत्रात बुमराहचा एक यॉर्कर चेंडू शंकरच्या पायावर लागला होता. बुमराहने गुरुवारी सांगितले, “माझ्या चेंडूवर शंकर दुखापतग्रस्त झाला हे खूप दुखद होते. मात्र, आता काळजीचे कोणतेही कारण नाही. शंकर पूर्णपणे तंदुरुस्त आहे.”
सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो याआधीज विश्वचषकातून बाहेर गेला आहे. भुवनेश्वरदेखील मांसपेशींमध्ये ताण आल्याने 2-3 सामन्यांसाठी बाहेर आहे. बुमराहने धवनविषयी बोलताना सांगितले, “धवन विश्वचषकातून बाहेर आहे हे खूप दुर्दैवी आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात शानदार खेळी केली. आपला संघ मजबूत असून पुढे जात आहे.”
बुमराहने इंग्लंडमधील मैदानांच्या स्थितीवरही भाष्य केले. तो म्हणाला, “या मैदानांवरील विकेट खूपच फ्लॅट आहे. आम्ही याविषयी विचार करत असून त्यानुसार काम करत आहोत. आम्हाला आमच्या अचुकतेवर काम करावे लागेल. त्यानंतर जर या मैदानांची मदत मिळाली तर चांगलेच आहे.”