कोल्हापूरच्या रिया पाटीलनं रचला नवा इतिहास, नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनमध्ये तीन ‘सुवर्ण’

| Updated on: Nov 21, 2022 | 6:27 PM

कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करत बेस्ट स्विमरचा खिताब पटकावला आहे.

कोल्हापूरच्या रिया पाटीलनं रचला नवा इतिहास, नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनमध्ये तीन सुवर्ण
Follow us on

कोल्हापूरः गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राने 428 गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करत बेस्ट स्विमरचा खिताब पटकावला आहे. यावेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियातर्फे या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटीलचा सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा 11 ते 13 नोव्हेंबर रोजी आसाममधील गुवाहटीमध्ये डॉ.झाकीर हुसेन अँकवेटिक कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 25 राज्यांनी सहभाग घेतला होता.

तसेच भारतातून एकूण साडे चारशे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आपल्या राज्याच्या 55 मुलांनी सहभाग घेतला होता.

त्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने 428 गुण मिळवून चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

महाराष्ट्राचा ऑलिम्पिक खेळाडू सुयश जाधव तसेच स्वप्निल पाटील, दीपक पाटील, आफ्रिदी, अभिषेक यांच्या उत्कृष्ट खेळामुळे तर मुलींमध्ये कांचन चौधरी, वैष्णवी जगताप ,शश्रुती नाकाडे, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, तृप्ती व नाशिकच्या सिद्धी व गौरी यांनी सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवली आहे.

पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्यावतीने यावर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तर रिया सचिन पाटील हिला उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

मिडले रिले, फ्रीस्टाइल रिले या दोन्ही स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मुला मुलींनी सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त केले आहे. खेळाडूंनी यश मिळवल्यानंतर गुवाहाटीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करण्यात आला.

महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर नाले, शिव छत्रपती पुरस्कृत राजाराम घाग तसेच टीम मॅनेजर अर्चना जोशी व श्री.तिवारी यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.