नवी दिल्ली: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. हरभजनने बुधवारी ट्विटवरून ही घोषणा केली. (Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings)
या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबरचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळणे एक उत्तम अनुभव होता. चेन्नईकडून खेळताना अनेक चांगल्या आठवणी आणि मित्र मिळाले. त्यांना मी नेहमीच लक्षात ठेवेन. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ, व्यवस्थापन आणि त्यांच्या चाहत्यांचे मी आभार मानतो, असे हरभजनने सांगितले.
हरभजन सिंगने गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. वैयक्तिक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. हरभजन हा आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 150 बळी टिपले आहेत. लसिथ मलिंगा (170), अमित मिश्रा (160), पीयूष चावला (156), ड्वेन ब्राव्हो (153) या मोजक्याच गोलंदाजांना अशी कामगिरी जमलेली आहे.
As my contract comes to an end with @ChennaiIPL, playing for this team was a great experience..beautiful memories made &some great friends which I will remember fondly for years to come..Thank you @ChennaiIPL, management, staff and fans for a wonderful 2years.. All the best..
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 20, 2021
2020 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. या संघात अनेक वरिष्ठ खेळाडुंचा भरणा होता. हीच बाब संघासाठी डोकेदुखी ठरली होती. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही स्तरावर चेन्नई सुपरकिंग्जच्या एकाही खेळाडूने लौकिकाला साजेशी कामगिरी केली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात संघ व्यवस्थापनाकडून चेन्नईच्या टीममध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
चेन्नईची दुसरी विकेट! रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार
ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनला हरभजनचा मोलाचा सल्ला
(Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings)