मुंबई: महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेले क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के एल राहुल, यांच्यावर आता छी थू होत आहे. टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहने पंड्या आणि राहुलच्या वक्तव्यावर आगपाखड केली. इतकंच नाही तर ज्या बसमध्ये पंड्या आणि राहुल असतील, तर मी त्या बसनेही प्रवास करणार नाही, असं हरभजन म्हणाला.
हार्दिक पंड्या आणि के एल राहुलने दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातून हकालपट्टी करण्यात आली.
याबाबत हरभजन सिंहने दोघांच्याही वक्तव्याचा निषेध केला. हरभजन म्हणाला, “आम्ही मित्रांसोबतही अशाप्रकारच्या गप्पा मारत नाही, या दोघांनी खुलेआम टीव्ही चॅनेलवर हे वक्तव्य केलं. त्यांच्यामुळे अन्य क्रिकेटपटूंबद्दलही लोक तसाच समज करुन घेतील. हरभजनही तसाच असेल, अनिल कुंबळे आणि सचिन हे सुद्धा असेच असतील, असे लोक बोलू शकतील”
हार्दिक पंड्याने त्या कार्यक्रमात महिलांबाबतच्या शारीरिक संबंधाबाबत भाष्य केलं होतं. पहिल्या संबंधानंतर मी घरातही सांगितलं होतं. तर के एल राहुलने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवला होता.
यावर हरभजन म्हणाला, पंड्या टीममध्ये कधीपासून आहे? तो टीम संस्कृतीबद्दल बोलू शकेल का?
पंड्या आणि राहुलच्या निलंबनाबाबत विचारलं असता, हरभजनने त्यांचं निलंबन व्हायलाच हवं होतं असं नमूद केलं. बीसीसीआयने चांगलं काम केल्याची पुष्टीही भज्जीने जोडली.
‘त्यांच्यासोबत प्रवासही करणार नाही’
यावेळी हरभजनने पंड्या आणि राहुलवर चांगलीच आगपाखड केली. जर भारतीय संघाच्या बसमधून मला पत्नी आणि मुलीसोबत प्रवास करायचा असेल, आणि त्या बसमध्ये पंड्या आणि राहुल असतील, तर मी त्यांच्यासोबत त्या बसमधून प्रवासही करणार नाही, असं हरभजन म्हणाला.
तुम्ही महिलांना केवळ एकाच नजरेतून पाहाता हे योग्य नाही, असं हरभजनने सुनावलं.
संबंधित बातम्या
निर्लज्जपणाचं वक्तव्य भोवलं, हार्दिक पंड्या-केएल राहुल आऊट
केएल राहुल आणि पंड्याच्या वक्तव्यावर विराट म्हणतो…
‘ते’ वक्तव्य महागात, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या अडचणीत
पंड्या म्हणतो, पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर घरी सांगितलं की…