नवी दिल्ली : महिलांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला चांगलचं भोवलं आहे. या दोन्ही खेळाडूंवर कारवाई करत बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डेमध्ये टीममधून त्यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाईही केली जाऊ शकते. या दोघांसाठी 15 दिवसांची चौकशी समिती नेमली जाऊ शकते. पंड्या आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलियातून भारतात पाठवलं जाऊ शकतं.
काय आहे प्रकरण?
हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी करणने या दोघांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यावेळी पंड्याने त्याच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. पंड्याने सांगितले की, त्याचं कुटुंब खूप मॉडर्न आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर त्याने त्याबाबत घरी येऊन सांगितले की, ‘मी आज करुन आलो’. पंड्याने आणखी एक किस्सा सांगितला. तो त्याच्या आई-वडिलांना एका पार्टीत घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, ‘कुठल्या मुलीला बघत आहेस?’, यावर हार्दिकने एकानंतर एक त्या पार्टीतील सर्व मुलींकडे बोट दाखवत म्हटले की, ‘मी सर्वांना बघत आहे.’
पंड्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर टीका होऊ लागली. त्याच्या या वागणुकीला लज्जास्पद असल्याचे सांगितले गेले. पंड्याच्या या वक्तव्याला महिला विरोधी आणि सेक्सिस्ट म्हटले गेले. सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात आली.
यानंतर या दोघांवर प्रत्येकी दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी केली. पंड्या आणि राहुलला बीसीसीआयने नोटीस पाठवत 24 तासात उत्तर मागितलं होतं. ज्यावर त्या दोघांनीही जे काही झाले, त्यावर माफी मागितली होती. मात्र विनोद राय दोघांच्याही स्पष्टीकरणाने समाधानी झाले नाहीत.
बीसीसीआयच्या कायदे समितीने या खेळाडुंच्या वादग्रस्त वक्तव्याला आचारसंहितेचा भंग घोषित करण्यास नकार दिला होता. यावर प्रशासक समितीच्या सदस्या डायना एल्डुजी यांनी हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला पुढील कारवाईपर्यंत निलंबित करण्याची शिफारस केली. एडुल्जींनी सुरुवातीलाच या दोघांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर या प्रकरणाला कायदे समितीकडे सोपवण्यात आले.
‘त्यांच्या चुकीच्या वागणुकीवर निर्णय येईपर्यंत त्यांना निलंबित ठेवणे आवश्यक आहे, जसे बीसीसीआयचे सीईओ (राहुल जोहरी) बाबत करण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना लैंगिक अत्यचाराप्रकरणी रजेवर पाठवण्यात आले होते’, अशी प्रतिक्रिया एडुल्जी यांनी दिली.
COA member Diana Edulji: It will be imperative that the players(Hardik Pandya and KL Rahul) be put under suspension till a further course of action is decided for this misconduct as was done in the case of CEO when he was sent on leave in the sexual harassment matter. pic.twitter.com/OM03YjMbHO
— ANI (@ANI) January 11, 2019
कर्णधार विराट कोहलीनेही या प्रकरणावर आपलं मत स्पष्ट केलं. “आम्ही भारतीय क्रिकेट टीमच्या दृष्टीने आणि जबाबदार खेळाडूच्या नात्याने त्यांच्या विचारांशी सहमत नाही. ते त्यांचे व्यक्तीगत विचार होते. आम्ही सध्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत”, असे विराट म्हणाला. तर “या वादामुळे आमच्या ड्रेसिंग रुमच्या वातावरणात कुठलाही बदल होणार नाही. याने आमचं मनोबल तुटू शकत नाही. एकदा निर्णय आला, की आम्ही कॉम्बिनेशनवर विचार करु”, असेही विराटने स्पष्ट केले.
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तीन वन डे सांमन्यांची मालिका उद्या म्हणजेच शनिवारपासून सुरु होत आहे.