हार्दिक पंड्याची झंझावाती एण्ट्री, 39 चेंडूत 105 धावा, 10 षटकार, चौकार किती?

| Updated on: Mar 04, 2020 | 11:14 AM

टीम इंडियाचा अष्टपैलू  खेळाडू हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya Century in DY Patil T20 Cup) दुखापतीनंतर मैदानात धडाकेबाज एण्ट्री केली.

हार्दिक पंड्याची झंझावाती एण्ट्री, 39 चेंडूत 105 धावा, 10 षटकार, चौकार किती?
Follow us on

नवी मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू  खेळाडू हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya Century in DY Patil T20 Cup) दुखापतीनंतर मैदानात धडाकेबाज एण्ट्री केली. पंड्याने केवळ 39 चेंडूत तब्बल 10 सिक्सर आणि 8 चौकारांसह 105 धावांची झंझावाती खेळी केली. डी वाय पाटील टी 20 चषक स्पर्धेत हार्दिक पंड्याने धुवाँधार खेळी करत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं. ( Hardik Pandya Century in DY Patil T20 Cup)

डी वाय पाटील चषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने रिलायन्स वनकडून खेळताना महालेखा परीक्षक (CAG) संघाविरुद्ध झंझावाती फलंदाजी केली. रिलायन्सने या सामन्यात कॅगचा 101 धावांनी पराभव केला.

हार्दिक पंड्याच्या 10 षटकार आणि 8 चौकारांच्या जोरावर रिलायन्सने 20 षटकात 5 बाद 252 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कॅगची टीम 151 धावांत गारद झाली.

गोलंदाजीतही पंड्याची कमाल

पंड्याने केवळ फलंदाजीत कमाल दाखवली असं नाही, तर त्याने गोलंदाजीतही चमक दाखवली. पंड्याने तब्बल 5 विकेट्स पटकावत, आपली अष्टपैलू कमगिरी बजावली. महत्त्वाचं म्हणजे हा सामना पाहण्यासाठी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसादही यावेळी मैदानात उपस्थित होते.

दुखापतीमुळे हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून बाहेर होता. पाच महिन्यापूर्वी त्याच्या कमरेला दुखापत झाली होती. त्यानंतर लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली.  त्यानंतर 26 वर्षीय पंड्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत होता.

धडाकेबाज खेळीनंतर पंड्या म्हणाला…

या धडाकेबाज खेळीनंतर पंड्या म्हणाला, “मैदानात अशापद्धतीने पुनरागमन झाल्याने आनंद आहे”. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या फेसबुक पेजवर हार्दिक म्हणाला, “माझ्यासारख्या खेळाडूसाठी हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. मी सहा महिन्यापासून मैदानाबाहेर आहे. अनेक दिवसांनी मी हा सामना खेळलो. दुखापतीतून सावरल्यानंतर माझं शरीर कितपत सज्ज आहे हे अनुभवण्यासाठी अशा पद्धतीचा सामना आवश्यक होता. माझी कामगिरी चांगली झाल्यान आनंदी आहे”

 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका येत्या 12 मार्चपासून सुरु होत आहे. त्यासाठी आफ्रिकेने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्याला स्थान मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • पहिला वन डे सामना – 12 मार्च – धर्मशाळा
  • दुसरा वन डे सामना – 15 मार्च –  लखनऊ
  • तिसरा वन डे सामना – 18 मार्च – कोलकाता