क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र सामना, अख्खा संघ शून्यावर बाद, तब्बल 754 धावांनी पराभव

| Updated on: Nov 21, 2019 | 12:33 PM

या सामन्यात अंधेरीची चिल्ड्रन वेलफेअर शाळा पराभूत झाली, पण अनोखी बाब म्हणजे या संघातील सर्वच्या सर्व खेळाडू हे शून्यावर बाद झाले.

क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र सामना, अख्खा संघ शून्यावर बाद, तब्बल 754 धावांनी पराभव
Follow us on

मुंबई : मुंबईची प्रतिष्ठित शालेय स्पर्धा हॅरिस शिल्डच्या पहिल्या बाद फेरीच्या सामन्यात एक अनोखी घटना घडली. या सामन्यात अंधेरीची चिल्ड्रन वेल्फेअर शाळा पराभूत झाली, पण अनोखी बाब म्हणजे या संघातील सर्वच्या सर्व खेळाडू हे शून्यावर बाद झाले (Harris shield tournament), कुणीही खातं उघडू शकलं नाही. इतकंच नाही, तर हा संपूर्ण संघ अवघ्या सहा षटकांमध्ये ऑल आऊट झाला (School Team All Out On Zero).

चिल्ड्रन वेल्फेअर संघाच्या खात्यात सात धावा आहेत, मात्र या धावा संघातील कुठल्याही फलंदाजाने काढलेल्या नाही, तर विरोधी संघातील गोलंदाजांच्या चुकांमुळे चिल्ड्रन वेल्फेअरला अतिरिक्त सात धावा मिळाल्या. जर चिल्ड्रन वेल्फेअरला अतिरिक्त धावा मिळाल्या नसत्या, तर हा संपूर्ण संघ शून्यावर ऑल आऊट झाला असता.

चिल्ड्रन वेल्फेअर शाळेविरोधात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळा होती. या संघाकडून मीडियम पेसर आलोक पालने तीन षटकांत तीन धावा देत सहा विकेट्स घेतल्या (School Team All Out On Zero). तर कर्णधार वरोद वाजेने तीन धावा देत दोन विकेट्स घेतल्या, इतर दोन फलंदाज रन आऊट झाले.

 

या सामन्यात खेळाच्या लाजिरवाण्या प्रदर्शनानंतर चिल्ड्रन वेल्फेअरला तब्बल 754 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या परंपरागत आंतरशालेय स्पर्धेत कदाचितच कुणी इतक्या मोठ्या फरकाने पराभूत झालं असेल.

आझाद मैदानावरील न्यू एरा मैदानावर आधी फलंदाजी करत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेकडून मीत मयेकरने तिहेरी शतक ठोकलं (338 नाबाद धावा, 134 चेंडू, 56 चौकार आणि 7 षटकार). स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेने 39 षटकांमध्ये 761 धावा केल्या. चिल्ड्रन वेल्फेअरच्या गोलंदाजांनी निश्चित तीन तासांत 45 षटक पूर्ण न केल्याने त्यांच्यावर 156 धावांचा दंड ठोठावण्यात आला. चिल्ड्रन वेल्फेअरने सहा षटक कमी टाकले.

इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकल्यामुळे विवेकानंद शाळेचे प्रशिक्षक महेश लोटीकर हे अत्यंत आनंदी आहेत. भारतीय संघाचा ‘हिट-मॅन’ रोहत शर्मा हा देखील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेचा माजी विद्यार्थी आहे.