मुंबई : भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आता पुन्हा एकदा मैदान गाजवायला तयार झाली आहे. तिने अवघ्या चार महिन्यांमध्ये तब्बल 26 किलो वजन कमी केलं आहे (Sania Mirza lost 26 Kgs ). सानियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने दोन वर्ष टेनिसपासून दूर राहिल्याने तिच्या फिटनेसवर किती फरक पडला आणि आता पुन्हा मैदानात उतरण्यासाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली हे सांगितलं आहे. सानियाला एक वर्षापूर्वी मुलगा झाला. त्यामुळे ती जवळपास दोन वर्षांपासून टेनिसपासून दूर होती (Sania Mirza Weight Loss).
सानियाने इन्स्टाग्रामवर तिचे दोन फोटो शेअर केले. यामध्ये दोन वर्षांपूर्वीची ती आणि आताची ती दाखवण्यात आलं आहे. फोटो पोस्ट करताना सानियाने एक भलं मोठं कॅप्शनही दिलं. “89 किलो वि. 63. आपल्या सर्वांचं एक ध्येय असतं. रोजचं ध्येय आणि दीर्घकालीन ध्येय. आपल्याला यावर अभिमान असायला हवा. मला बाळ झाल्यावर तंदुरुस्त होण्यासाठी, माझं हे ध्येय गाठण्यासाठी 4 महिने लागले. पुन्हा फिटनेस मिळवण्यासाठी आणि इतक्या मोठ्या स्तरावर स्पर्धा करण्यासाठी बराच वेळ लागला असं वाटतं. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. कुणी तुम्हाला कितीही सांगितलं की हे शक्य नाही, तरी त्याने काहीही फरक पडत नाही. कारण आपल्यासोबत कोण आहे हे देवाला माहित आहे. जर मी हे करु शकते, तर कुणीही करु शकतं.”
सानिया मिर्झाचे हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. नेटकरी तिच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत.
सानियाने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. तिने सुरुवातील काही कार्डिओ व्यायाम केले. त्यानंतर हळूहळू तिने तिच्या व्यायामाच्या प्रकारांमध्ये वाढ केली. यादरम्यान, ती ध्येयापासून भटकली नाही. व्यायामासोबतच तिने संतुलित आहारही घेतला. सानियाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेती सानिया मिर्झाने जानेवारीत महिन्यात होबर्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन केलं.