चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नईने शानदार विजय मिळवला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपण सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर असल्याचं दाखवून दिलं. दुखापतीनंतर पुनरागमन करत धोनीने फलंदाजी आणि यष्टीरक्षणातून त्याची कामगिरी दाखवून दिली. वेगवान फलंदाजी करत धोनीने 22 चेंडूत 44 धावा केल्या, ज्यात अखेरच्या षटकातील दोन षटकारांचाही समावेश आहे. दिल्लीला 99 धावात गुंडाळत चेन्नईने मोठा विजय मिळवला. चेन्नईचा स्टार खेळाडू इम्रान ताहीरने पुन्हा एकदा शानदार खेळी करत चार फलंदाजांना माघारी धाडलं.
इम्रान ताहीरची गोलंदाजी त्याच्या सेलिब्रेशनच्या स्टाईलमुळेच जास्त चर्चेत असते. पंचांनी फलंदाज बाद झाल्याचा निर्णय देताच 40 वर्षीय ताहीर संपूर्ण मैदानाची चक्कर मारुन येतो. चाहत्यांनाही ताहीरचं सेलिब्रेशन पाहून हसू आवरणं कठीण होऊन जातं.
इम्रान ताहीर चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांमध्ये पराशक्ती एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध आहे. विकेट घेतल्यानंतर तो थेट चाहत्यांनाही भेटायला जातो. बुधवारी पुन्हा एकदा त्याचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. ताहीरच्या सेलिब्रेशनबद्दल धोनीला काय वाटतं त्याबाबतही त्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ताहीरला सेलिब्रेशन करताना पाहून चांगलं वाटतं. पण आम्ही हा निर्णय घेतलाय की मी आणि शेन वॉट्सन सेलिब्रेशन करण्यासाठी इम्रानच्या जवळ जाणार नाहीत, कारण तो दुसऱ्या बाजूला धावतो, असं मिश्कील शैलीत धोनीने सांगितलं.
वॉट्सन आणि माझ्यासाठी हे जरा अवघड असतं की आम्ही त्याच्या जवळ जाऊन सेलिब्रेट करावं. त्यामुळे तो परत येण्याची आम्ही वाट पाहतो आणि परत आल्यानंतर सेलिब्रेट करतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो संपूर्ण मैदानाला वेढा मारुन परत त्याच्या जागी येतो, असंही धोनी म्हणाला.
इम्रान ताहीरने दिल्लीविरोधात 3.2 षटकांमध्ये 12 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. यासोबतच या मोसमात चेन्नईकडून 13 सामन्यात त्याने 21 विकेट घेतल्या आहेत.