World cup इंग्लंड : विश्वचषक 2019 चा थरार संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या तिन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या सलामीवीर जोडीची तुफान फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजांची कमाल या जोरावर काल इंग्लंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. यामुळे न्यूझीलंडची धाकधूक चांगलीच वाढली आहे. कारण उद्या (5 जुलै) होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतरच न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये जाणार का याचा निकाल लागणार आहे. तर दुसरीकडे सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी उद्या पाकिस्तानला अनेक अग्निपरीक्षांचा सामना करावा लागणार आहे.
विश्वचषकातील 41 व्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 306 धावांचं आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सर्वबाद 186 धावा काढत गारद झाला. त्यामुळे तब्बल 119 धावांच्या फरकाने इंग्लंडने बुधवारी (3 जुलै) सामना जिंकला. त्यामुळे इंग्लंडचे विश्वचषकातील सेमीफायनलचे स्थान निश्चित झाले आहे.
टॉस जिंकणे
तर दुसऱ्या बाजूला सेमीफायनलची आस लागून राहिलेल्या पाकिस्तानचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्ल्डकपमध्ये उद्या बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून मोठी धावसंख्या उभारली तरच पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये धडक मारता येईल. पण जर आजच्या सामन्यातील टॉस बांगलादेशने जिंकला तर त्याचक्षणी पाकिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जाईल आणि त्याचसोबतच न्यूझीलंडची चौथ्या क्रमांकावर वर्णी लागेल.
England book their place in the semi-finals!
Jonny Bairstow’s century was the highlight of the England innings before the bowlers took over to help seal a 119-run win. #ENGvNZ | #CWC19 pic.twitter.com/6wE2xVvq0W
— ICC (@ICC) July 3, 2019
नेट रनरेटची वाढ
सद्यस्थितीत इंग्लंड 12 गुणांसह गुणातालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर 11 गुणांसह न्यूझीलंड आहे. तसेच न्यूझीलंडचा सध्याचा नेट रनरेट +0.175 आहे. तर पाकिस्तान सध्या 9 गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून त्यांचा नेट रनरेट -0.792 इतका आहे. म्हणजेच जर या दोन्ही रनरेटची तुलना केली तर, न्यूझीलंडपेक्षा पाकिस्तानचा रनरेट फार कमी आहे. त्यामुळे जरी आजचा सामना पाकिस्तानने जिंकला, तरी त्यांची गुणसंख्या 11 होईल. पण त्यांचा नेट रनरेट हा फार कमी असल्याने न्यूझीलंडला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळेल.
मोठी धावसंख्या
त्यामुळे पाकिस्तानला जर सेमीफायनलमध्ये धडक मारायची असल्यास, त्यांना टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानंतर पाकिस्तानला त्यांना 350 ते 400 धावा कराव्या लागणार आहे. मात्र एवढी मोठी धावसंख्या उभारुनही पाकिस्तानला बांगलादेशला 100 धावांपर्यंत सर्व खेळाडूंना बाद करावे लागेल. त्यानंतर न्यूझीलंडपेक्षा पाकिस्तानचा रनरेट वाढेल आणि पाकिस्तान सेमीफायनयलमध्ये जाईल.
दुसरी गोलंदाजी
विशेष बाब म्हणजे जर उद्या होणाऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली. त्यानंतर एकही विकेट न गमावता धावांचा पाठलाग करत विजय मिळवला, तरीही त्यांना सेमीफायनलमध्ये जाता येणार नाही. कारण त्यांचा नेट रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त होऊ शकणार नाही.
पाकिस्तानची अग्निपरीक्षा
त्यामुळे आज बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला सर्वात आधी टॉस जिंकावा लागणार आहे. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत त्यांना मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. हे सर्व कमी म्हणून की काय, तर त्यांना बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना 100 धावांच्या आधी माघारी धाडावे लागणार आहे. म्हणजेच जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये खेळायचे असेल, तर आजच्या सामन्यात त्यांना एकापेक्षा अधिक अग्नीपरीक्षेला सामोरी जावे लागणार आहे.
भारत वि. पाकिस्तान सेमीफायनलची संधी
न्यूझीलंड सध्या 11 गुणांसह चौथ्या, तर भारत 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण 9 गुणांसह पाकिस्तानही पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने बांगलादेशला मोठ्या फरकाने हरवल्यास चौथ्या क्रमांकावर येण्याची संधी आहे. तर दुसरीकडे भारतालाही पहिल्या क्रमांकाची संधी आहे. कारण, भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होतोय. येत्या 6 तारखेच्या या सामन्यात भारताचा विजय झाल्यास अव्वल स्थान मिळेल. पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. कारण, सध्या 14 गुणांसह पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेला हरवल्यास ऑस्ट्रेलिया निर्विवादपणे 16 गुणांसह पहिल्या स्थानी कायम राहिल. नियमानुसार, पहिला वि. चौथा आणि दुसरा वि. तिसरा असा सेमीफायनल सामना रंगणार आहे. सध्या आहे तिच परिस्थिती राहिल्यास भारत वि. इंग्लंड सेमीफायनल होऊ शकतो.