मुंबई : क्रिकेट विश्वचषकाला येत्या 30 मे पासून सुरुवात होत आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे. क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीद्वारे काही नियम बदलण्यात आले आहे. वनडे क्रिकेटसाठी हे नियम लागू करण्यात आले असून त्याची सुरुवात वर्ल्ड कपपासून होत आहे.
विश्वचषकासाठी लागू होणारे नवे नियम
1. हेल्मेटला बॉल लागून झेल टिपल्यास बाद
जर फलंदाजाने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून उडाला आणि तो दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेलल्यास फलंदाजाला बाद ठरवलं जाईल. मात्र हँडल द बॉलच्या स्थितीत फलंदाज नाबाद असेल
2. पंचासोबत हुज्जत घालणारे खेळाडू मैदानाबाहेर
कित्येकदा भर मैदानात अनेक खेळाडू पंचांचा नियम न पटल्याने त्यांच्याशी भांडण करतात. पंचाना वाईट बोलतात. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना पंच थेट मैदानाबाहेर काढू शकतात. पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना आयसीसीच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’ च्या 1.3 नियमाद्वारे दोषी ठरवून पंच मॅचदरम्यान बाहेर काढू शकतात.
3. रिव्ह्यूची संख्या कमी होणार नाही
बऱ्याचदा मॅचदरम्यान दोन्ही संघ डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम अर्थात डीआरएस वापर करत रिव्ह्यू मागतात. यावेळी कधीकधी पंचानी दिलेला निर्णय अंतिम ठेवला जातो. यामुळे संघांकडे असलेला रिव्ह्यू वाया जातो. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान संघाने डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला, त्यावेळीही पंचांचा रिव्ह्यू कायम राहिल्यास संघांकडच्या रिव्ह्यूची संख्या कमी होणार नाही.
4. चेंडू दोनदा बाऊन्स झाल्यास ‘नो बॉल’
कित्येकदा मॅचदरम्यान गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर चेंडू दोनदा बाऊन्स होतो. मात्र यंदा विश्वचषकादरम्यान चेंडू दोनदा बाऊन्स होऊन फलंदाजाकडे गेल्यास तो नो बॉल देण्यात येणार आहे. आयसीसीने याबाबतचा नवीन नियम लागू केला आहे.
5. क्रिजवरील रेषेवर बॅट असल्यास फलंदाज आऊट
बाद होण्याच्या भितीने अनेकदा धाव घेताना खेळाडू डाय मारुन धावपट्टीच्या रेषेवर बॅट ठेवतात. बॅट रेषेवर असल्याने खेळाडू नाबाद ठरतो. मात्र आयसीसीच्या नव्या नियमावलीनुसार, खेळाडूची बॅट ऑन द लाईनवर असेल तर त्याला बाद ठरवलं जाणार आहे. मात्र जर बॅट किंवा फलंदाज ऑन द लाईनच्या आत असेल तर फलंदाज नाबाद असणार आहे.
6. बॅटचे मापही निश्चित
कित्येकदा फलंदाजाच्या बॅटचे माप नियमानुसार नसल्याचा दावा केला जातो. मात्र यंदा विश्वचषकादरम्यान बॅटची लांबी आणि जाडी किती असावी याचे माप देण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, बॅटची रुंदी 108 मि.मी, जाडी 67 मि.मी असावी असे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय बॅटची कडा 40 मि.मीपेक्षा जास्त नसावी असेही फलंदाजांना सांगण्यात आलं आहे. तसेच बॅटच्या मापाबाबत पंचांना संशय आल्यास, पंच लगेचच माप तपासू शकतात.
7. बाय आणि लेग बायच्या धावा वेगवेगळ्या असणार
गोलंदाजाने नो बॉल टाकल्यास फलंदाजाला बाय किंवा लेग बायद्वारे अतिरिक्त धावांमध्ये धरल्या जातात. मात्र विश्वचषकादरम्यान नो बॉलद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त धावा या वेगवेगळ्या ग्राह्य धरल्या जाणार आहे. म्हणजेच गोलंदाजाने नो बॉल टाकल्यानंतरच्या बाय किंवा लेग बाय अशा धावांची विभागणी करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :