मुंबई : महेंद्रसिंग धोनी… भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारं नाव… जगातील लाखोंची प्रेरणा असणारं नाव आणि एक अविश्वसनीय वारसा या शब्दात आयसीसीने शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीने धोनीच्या 38 व्या जन्मदिनानिमित्त एका खास व्हिडीओतून त्याच्या कारकीर्दीला सलाम केलाय. यामध्ये जगभरातील विविध दिग्गज खेळाडूंच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये या खेळाडूंनी धोनीचं त्यांच्या कारकीर्दीतील योगदान सांगितलं आहे.
धोनीने भारतीय क्रिकेटला प्रत्येक फॉरमॅटमध्ये सर्वोच्च यश मिळवून दिलंय. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने 2011 चा विश्वचषक जिंकला, त्याअगोदर 2007 चा टी-20 विश्वचषकही जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताने नावावर केली. भारतीय संघाचं नेतृत्त्व करत सर्वोच्च यश मिळवून दिल्याबद्दल आयसीसीनेही धोनीला सलाम केलाय. आयसीसीकडून मिळणारा हा सन्मान भारतीयांचा अभिमान वाढवणारा आहे.
? A name that changed the face of Indian cricket
? A name inspiring millions across the globe
? A name with an undeniable legacyMS Dhoni – not just a name! #CWC19 | #TeamIndia pic.twitter.com/cDbBk5ZHkN
— ICC (@ICC) July 6, 2019
भारतीय संघामधून कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज जसप्रीत बुमराने धोनीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
धोनीविषयी बोलताना विराट कोहली म्हणतो, धोनी एक असा माणसू आहे, ज्याच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तो माझा कर्णधार होता आणि कायम असेल. आमच्यातला ताळमेळ ही नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. मी कायम धोनीने दिलेल्या सल्ला पाळण्यासाठी उत्सुक असतो, असं विराट म्हणाला.
धोनीविषयी बुमरानेही प्रतिक्रिया दिली आहे. मी 2016 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलो तेव्हा धोनी कर्णधार होता. त्याची शांतपणे नेतृत्त्व करण्याची कला पाहून नेहमीच मदत मिळाली, असं बुमरा म्हणाला.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनेही धोनीला सलाम केलाय. धोनीसारखा खेळाडू पुन्हा कधीही होऊ शकत नाही, असं स्टोक्स म्हणाला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना धोनी आणि स्टोक्स एकत्र होते. तेव्हाचे अनुभवही त्याने सांगितले आहेत.
इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जॉस बटलरनेही धोनीविषयी प्रतिक्रिया दिली. मी स्वतः धोनीचा मोठा चाहता असून तो माझ्यासाठी कायम आदर्श राहिलाय, असं बटलर म्हणाला. एक विकेटकीपर म्हणून धोनी कायम माझा आदर्श राहिलाय. मैदानावर असताना मिस्टर कूलचं काम अतुलनीय असतं. तो या खेळाचा एक मोठा भाग असून मी त्याचा चाहता आहे, असं बटलर म्हणाला.