INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 173 धावांचं तगडं आव्हान, गोलंदाज अपयशी

| Updated on: Feb 23, 2023 | 8:07 PM

ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय संघ हे आव्हान यशस्वीपणे गाठणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 173 धावांचं तगडं आव्हान, गोलंदाज अपयशी
Follow us on

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 173 धावांचं आव्हान ठेवलं आहे.नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय संघ हे आव्हान यशस्वीपणे गाठणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन्ही संघांमधील आकेडवारी पाहिली तर त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. आतापर्यंत 30 T-20 सामने झाले आहेत. यात 30 पैकी 22 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. यातील 5 सामने वर्ल्डकपमध्ये झाले असून 3 मध्ये ऑस्ट्रेलिय़ाने विजय मिळवला आहे. तर भारताने दोन सामने जिंकलेत.

ऑस्ट्रेलियाचा डाव

एलिसा हिली आणि बेथ मूनी या जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एलिसा हिली राधा यादवच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाली. त्यानंतर मूनी आणि मेग लॅनिंगनं डाव सावरला. दोघांची संघाची धावसंख्या 88 पर्यंत नेली. मात्र शिखा पांडेच्या गोलंदाजीवर बेथ मूनी तंबूत 54 धावा करून परतली. त्यानंतर लॅनिंगनं आपली खेळी सुरुच ठेवली. तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर गार्डनर दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. ती 31 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर मेग लॅनिंग आणि ग्रेस हॅरिस जोडी फार काही करू शकली नाही. हॅरीस शिखा पांडेच्या गोलंदाजीवर 7 धावा करून बाद झाली. त्यानंतर गोलंदाजांना मेग लॅनिंग आणि एलिसे पेरी ही जोडी फोडता आली नाही. रेणुका सिंगने सर्वात महागडं षटक टाकलं. तिने 4 षटकात 41 धावा दिल्या. तिला एकही गडी बाद करता आला नाही. शिखा पाडे (2), राधा यादव 1 आणि दीप्ती शर्मानं 1 गडी बाद केला. तर स्नेह राणाला एकही गडी बाद करता आला नाही.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.

Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.