लंडन : विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 6 जुलै रोजी सामना होत आहे. भारताने आधीच सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. तर श्रीलंका बाहेर पडली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेसाठी उद्याचा सामना औपचारिकता आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं आहे. यॉर्कर नव्हे तर अचूकतेमुळे बुमराह धोकादायक गोलंदाज आहे, असं मलिंगा म्हणाला.
बुमराहवर स्वत:च्या कामगिरीवर विश्वास आहे, त्यामुळेच विश्वचषकात चांगली गोलंदाजी करण्याचा दबाव त्याच्यावर नाही, असंही मलिंगाने नमूद केलं.
मुंबई इंडियन्समध्ये एकत्र
मलिंगा आणि बुमराह हे दोन्ही गोलंदाज आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात एकत्र खेळत होते. दोघेही घातक गोलंदाज आणि दोघेही यॉर्कर टाकण्यात पटाईत आहेत. यॉर्करबाबत मलिंगा म्हणाला, “कोणीही यॉर्कर टाकू शकतो, स्लो बॉल टाकू शकतो, लाईन-लेंथ किंवा दिशा आणि टप्पा राखू शकतो. बुमराहकडे हे सर्व आहेच मात्र त्याच्याकडे अचूकता हा गुण अधिक आहे”
मी 2013 मध्ये बुमराहसोबत काही वेळ घालवला. त्याला शिकण्याची भूक आहे. तो तातडीने नवं आत्मसात करतो. बुमराहने कमी काळात खूप सारं शिकून घेतलं आहे, असं मलिंगाने सांगितलं.
भारत 2011 प्रमाणे यंदाही विश्वचषक जिंकू शकतो, असाही अंदाज मलिंगाने व्यक्त केला. भारतीय संघात क्षमता आहे, अनुभवी आणि युवा खेळाडूंचं मिश्रण आहे. रोहित शर्मा उत्तम फलंदाजी करत आहे. विराट कोहली मोठी खेळी करत आहे. त्यामुळे भारत विश्वचषकाचा दावेदार आहे, असं मलिंगा म्हणाला.