नवी दिल्ली : सध्या देशासह संपूर्ण जगात क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. विश्वचषकात भारतीयांसाठी सर्वात रोमांचक असा कुठला सामना असेल, तर तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षा भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना जास्त उत्सुकता असते. येत्या 16 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. त्यापूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात आहे. त्याशिवाय या सामन्याच्या प्रमोशनसाठी अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या जाहिरातींवर भारताची स्टार टेनिस खेळाडू आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा चांगलीच भडकली आहे. तिने अशा प्रकारच्या जाहिराती न पसरवण्याचा सल्ला क्रिकेटप्रेमींना दिला.
येत्या 16 जूनला रविवारी मँचेस्टरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सामन्याच्या एका आठवड्यापूर्वी प्रमोशनल व्हिडीओचा सोशल मीडियावर पाऊस पडतो आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये कमालीचा उस्ताह आहे, हे या जाहिरातींवरुन दिसून येत आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपल्या संघाच्या समर्थनात जाहिरात बनवली आहे. मात्र, ही जाहिरात वॉर सानिया मिर्झाला काही पचनी पडलेली नाही. त्यामुळे तिने या जाहिरातींवर आक्षेप व्यक्त केला आहे.
Cringeworthy ads on both sides of the border ? seriously guys, you don’t need to ‘hype up’ or market the match anymore specially with rubbish! it has ENOUGH attention already!It’s only cricket for God sake, and if you think it’s anymore than that then get a grip or get a life !!
— Sania Mirza (@MirzaSania) June 12, 2019
“सीमेच्या दोन्ही बाजूने फालतू जाहिराती सुरु आहेत. हे खूप वाईट आहे. तुम्हा सर्वांना मी विनंती करते, कृपया हा एक क्रिकेट सामनाच राहू द्या. तुम्हाला या प्रकारच्या अनावश्यक गोष्टीचा प्रचार करण्याची काहीही गरज नाही. हे फक्त क्रिकेट आहे”, असं ट्वीट करत सानियाने अशा प्रकारच्या जाहिरातींचा प्रचार न करण्याचा सल्ला क्रिकेटप्रेमींना दिला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या या सामन्याला एखाद्या युद्धाप्रमाणे बघितलं जात आहे. दुसरीकडे, विश्वचषक 2019 चा ब्रॉडकास्टिंग पार्टनर स्टार स्पोर्ट्सने एक जाहिरात प्रदर्शित केली. यामध्ये या सामन्याला थेट ‘फादर्स डे’शी जोडण्यात आलं आहे. योगायोगाने 16 जूनला ‘फादर्स डे’ आला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या या जाहिरातीत भारताला पाकिस्तानच्या पित्याच्या रुपात दाखवलं गेलं आहे. तर, पाकिस्तानमध्ये भारताला चिडवण्यासाठी एक जाहिरात तयार करण्यात आली. यामध्ये भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सानियाने याच जाहिरातींवर आक्षेप घेत त्याचा प्रचार न करण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिला आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO :