लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात माजी कर्णधार आणि विद्यमान सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनीच क्षेत्ररक्षणाची धुरा हाती घेतली. गोलंदाज मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाल्यानंतर शनिवारी कॉलिंगवूड यांनाच क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं. 42 वर्षीय कॉलिंगवूडला मैदानात पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते.
आर्चरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. आर्चर स्वतः मार्क वूडला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी गेला होता. चौथ्या षटकात गोलंदाजी करत असताना वूडचे स्नायू दुखावले. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि फिरकीपटू आदिल रशीद खांद्याच्या दुखापतीमुळे अगोदरच सामन्यातून बाहेर होते. अशा परिस्थितीत खुद्द प्रशिक्षकालाच मैदानात उतरावं लागलं.
कॉलिंगवूड यांनी 2001 ते 2011 या काळात इंग्लंडसाठी 197 सामने खेळत 5 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या, शिवाय 111 विकेटही त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी 68 कसोटी सामने आणि 36 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्येही इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. कॉलिंगवूड हे एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणूनही परिचित होते. त्यांनी घेतलेला एक झेल प्रचंड गाजला होता.
VIDEO : कॉलिंगवूड यांनी घेतलेला झेल