ENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा?

| Updated on: Jul 15, 2019 | 9:32 AM

जेव्हा सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे टाय राहूनही इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला.

ENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा?
Follow us on

लंडन : आयसीसी विश्वचषक 2019 चा अंतिम सामना हा अत्यंत थरारक झाला. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात दोन्ही संघाने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. मात्र,  हा सामना दोनवेळा टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये हा सामना खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही पुन्हा सामना टाय झाला. तरीही किवींना पराभूत करत इंग्लंड विश्वविजेता झाला. तब्बल 44 वर्षांनंतर इंग्लंडने विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. पण, जर सामना टाय झाला, तर इंग्लंड जिंकला कसा, हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल.

न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 241 धावा काढल्या आणि इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 242 धावा करायच्या होत्या. मात्र, इंग्लंडनेही 50 षटकांत 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. त्यानंतर सामन्याचा निकालासाठी सुपर ओव्हर टाकण्यात आली. यामध्ये इंग्लंडने 15 धावा केल्या आणि न्यूझीलंडनेही 15 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला.


चौकारांच्या आधारे निर्णय 

जेव्हा सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे टाय राहूनही इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला. इंग्लंडने फलंदाजीदरम्यान एकूण 26 चौकार ठोकले. तर न्यूझीलंडने 17 चौकार मारले होते. त्यामुळे दोन वेळा टाय झालेल्या सामन्यात इंग्लंडला चौकारांच्या आधारे विजयी घोषित करण्यात आलं.

इंग्लंडच्या इनिंगमधील एकूण चौकार/षटकार

22 चौकार, 2 षटकार

2 चौकार (सुपर ओव्हरमध्ये)

न्यूझीलंड इनिंगमधील एकूण चौकार/षटकार

14 चौकार, 2 षटकार

1 षटकार (सुपर ओव्हरमध्ये)

ICC चा नियम काय?

आयसीसीच्या नियमानुसार, जर सामना टाय झाला तर त्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. जर सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, जे की यंदाच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये झाला. अशा परिस्थितीत चौकारांच्या आधारे निर्णय घेतला जातो. म्हणजे ज्या संघाने संपूर्ण सामन्यात जास्त चौकार मारले असतील तो विजयी. यामध्ये संपूर्ण सामन्यासोबतच सुपर ओव्हरमधील चौकारही मोजले जातात. याच नियमाच्या आधारे रविवारी इंग्लंड विश्वविजेता बनला.

दुसरीकडे, आयसीसीच्या या नियमाने न्यूझीलंडचं स्वप्न भंगलं. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी आयसीसीच्या या नियमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्कॉट स्टायरिस, माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगसह अनेकांनी आयसीसीला ट्वीट करत या नियमावर टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

ENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं

ENGvsNZ: विश्वविजेता टाय! सुपर ओव्हरचा थरार!! इंग्लंड जगज्जेता!!!

VIDEO : बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्या आजीचा व्हिडीओ व्हायरल

पराभवानंतरही भारतीय संघावर पैशांचा पाऊस, विश्वविजेत्याचं बक्षीस किती?