अरुण जेटलींचा पुतळा उभारणार असाल तर स्टॅंडला दिलेलं माझं नाव हटवा, बिशन सिंह बेदी आक्रमक

| Updated on: Dec 23, 2020 | 7:35 PM

फिरोज शाह कोटला स्टेडियममधील एका स्टॅंडला 2017 मध्ये टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशन सिंह बेदी यांचं नाव देण्यात आलं होतं.

अरुण जेटलींचा पुतळा उभारणार असाल तर स्टॅंडला दिलेलं माझं नाव हटवा, बिशन सिंह बेदी आक्रमक
Follow us on

दिल्ली : दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये अरुण जेटलींचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळा उभारण्याच्या निर्णयावरुन टीम इंडियाचे माजी खेळाडू बिशन सिंह बेदींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर जेटलींचा पुतळा उभारणार असाल, तर स्टॅंडला दिलेलं माझं नाव हटवा, अशी आक्रमक भूमिकाच बेदींनी घेतली आहे. तसेच त्यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट मंडळाच्या (DDCA) सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. बेदी यांनी डीडीसीएला पत्राद्वारे खडेबोल सुनावले आहेत. (If you want to erect a statue of Arun Jaitley Delete my name given to the stand, Bishan Singh Bedi aggressive)

बेदींनी डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांना पत्र लिहिलं आहे. रोहन जेटली हे अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. “मी फार सहनशील व्यक्ती आहे. पण आता माझ्या सहनशिलतेचा बांध फुटला आहे. डीडीसीएने माझ्या अंत पाहिलाय. त्यामुळे मी माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मला हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आलं. तसेच स्टॅंडला देण्यात आलेलं माझ नावही काढून टाकावं”, अशी मागणी बेदींना या पत्राद्वारे केली आहे. 2017 मध्ये या स्टेडियममधील स्टॅंडला बेदी यांचं नाव देण्यात आलं होतं.

अरुण जेटली यांनी 1999 ते 2013 अशा एकूण 14 वर्ष डीडीसीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. जेटलींच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्टेडियममध्ये सहा फुटांचा पुतळा उभारण्याचा मानस डीडीसीएचा आहे.

बेदी काय म्हणाले?

“मी राजीनामा देण्याचा निर्णय फार विचारपूर्वक घेतला आहे. मी सन्मानाचा अपमान करण्यातला नाही. मात्र अधिकार आणि सत्तेसह आपल्यावर काही जबाबदारीही येते. मी फार तत्वनिष्ठ व्यक्ती आहे. मी माझ्या तत्वाने क्रिकेट खेळलोय. तसेच निवृत्तीनंतरही मी त्या तत्वाने वागतोय. मी कधीच तत्वांशी तडजोड करत नाही. ते मला करताही येत नाही”, यामुळे मी राजीनामा देतोय, असंही बेदींनी नमूद केलं. ‘

“मला कधीच अरुण जेटली यांची कामाची पद्धत पटली नाही. डीडीसीएसाठी ते ज्या लोकांची निवड करायचे, त्याला माझा विरोध असायचा, हे सर्वांना माहिती आहे. एकदा जेटलींच्या घरी बैठकीसाठी गेलो होतो. या बैठकीत एक व्यक्ती फार उर्मटपणे वागत होती. या व्यक्तीला जेटलींनी रोखले नाही. त्यामुळे मी या बैठकीतून निघून आलो”, असंही बेदी म्हणाले.

“मी जुन्या विचारांचा असेल. पण मला भारतीय क्रिकेटपटू असल्याचा प्रचंड अभिमान आहे. मी स्वाभिमानी आहे. जेटलींच्या मृत्यूनंतर प्रचंड घाईघाईत फिरोजशाह कोटला स्टेडियमला जेटली यांचं नाव देण्यात आलं. हा निर्णय फार चुकीचा होता. यांना ही चूक लक्षात येईल, असं मला वाटलं होतं. पण मी चूक ठरलो. आता या मैदानात जेटलींचा पुतळा बसवणार आहे. मला या प्रकाराची कल्पनाही करवत नाही”, अशा शब्दात बेदींनी आपला संताप व्यक्त केला.

“जेटलींच्या आठवणीं संसदेत जपायला हव्यात”

जेटली हे राजकीय नेते होते. त्यामुळे त्यांना स्मरणात ठेवायचं असेल, तर त्यासाठी संसद हे योग्य ठिकाण आहे. लॉर्डसच्या मैदानात डबल्यू जी ग्रेस, ओव्हल मैदानावर सर जॅक हॉब्स, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सर डॉन ब्रॅडमॅन तर बार्बाडोसमध्ये सर गॅरी सोबर्स यांचे प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.

क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटमधील आदर्शांचेच प्रतिमा हव्यात. राजकारण्यांची जागा ही केबिनमध्ये आहे. हे डीडीसीएला कळत नाही. प्राथमिकता कशाला द्यायची हे डीडीसीएल समजत नाही, त्यामुळे मला या डीडीसीएचं सदस्य रहायचं नाही. तसंच लवकरात लवकर स्टॅंडला देण्यात आलेलं माझं नाव हटवावं, अशी मागणी बेदींनी केली.

संबंधित बातम्या : 

युवा नेता ते लढवय्या मंत्री… अरुण जेटली यांचा अल्पपरिचय

(If you want to erect a statue of Arun Jaitley Delete my name given to the stand, Bishan Singh Bedi aggressive)