मुंबई : बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत आहे. पहिल्या डावात 88 धावांची आघाडी घेतल्यानंतर ही धावसंख्या गाठताना भारताने 4 गडीही गमावले. रोहित शर्मा 12, शुभमन गिल 5, विराट कोहली 13 आणि रविंद्र जडेजा 7 धावांवर बाद झाले. नाथन लायननं रोहित शर्मा, शुभमन गिल आणि रविंद्र जडेजाला बाद केलं.खेळपट्टी पाहता भारताला या मैदानात 200 हून अधिक धावा केल्यास जिंकण्याची संधी आहे. अन्यथा हा सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडेच झुकलेला आहे. असं असताना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने घेतलेल्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू अजित आगरकरनं आश्चर्य व्यक्त केले आहे. पहिल्या एका तासात रविचंद्रन अश्विनला गोलंदाजी न दिल्याने आगपाखड केली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं 15 षटकानंतर आर. अश्विनकडे चेंडू सोपवला. सुरुवातीला मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि नंतर अक्षर पटेलला गोलंदाजी दिली. त्यामुळे पहिल्या एका तासात एकही विकेट मिळाला नाही. त्यानंतर अश्विन आला आणि पीटर हँडस्कॉम्बला बाद केलं. त्यानंतर अलेक्स कॅरे आणि टोडी मर्फीलाही तंबूचा रस्ता दाखवला.
“भारताची रणनिती चुकीची ठरत आहे. पहिल्या तासात अश्विनला गोलंदाजी न देणं आश्चर्यकारक आहे. तो भारताचा मुख्य गोलंदाज आहे. त्याने या सामन्यात आतापर्यंत 16 षटकं टाकली आहे. मला माहिती आहे अक्षर पटेल स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून आहे. पण अश्विनला चेंडू सोपवणं गरजेचं आहे. “, असं अजित आगरकर समालोचन करताना म्हणाला.
भारताकडून आर. अश्विननं 20.3 षटकात 44 धावा देत 3 गडी बाद केले. रविंद्र जडेजाने 32 षटकात 78 धावा देत 4 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर उमेश यादवनं 5 षटकात 12 धावा देत 3 गडी टिपले. दुसरीकडे मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलच्या हाती काहीच लागलं नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताला प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. ही मालिका भारताला 3-0 किंवा 3-1 ने जिंकायची आहे. तिसरा कसोटी सामना भारताने गमावला तर मात्र चौथ्या कसोटीत भारतावर दबाव असेल. त्याचबरोबर श्रीलंका न्यूझीलँड मालिकेवर अवलंबून राहावं लागेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने पराभव झाल्यास अंतिम फेरीचं गणित बदलेल. कदाचित श्रीलंका आणि भारत अंतिम फेरीत भिडू शकतात. मात्र श्रीलंकेला अशा स्थितीत न्यूझीलँड विरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन.