IND vs AUS : त्यांच्याकडे वॉर्नर-स्मिथ तर आपल्याकडेही बुमराह-शमी आहेत, पुजाराने कांगारुंना ललकारले

| Updated on: Nov 16, 2020 | 5:36 PM

भारताने 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी कांगारुंना धूळ चारली होती, परंतु त्यावेळी कांगारुंचा संघ डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथविना खेळत होता. ऑस्ट्रेलियाचे हे दोन्ही खेळाडू संघात परतले आहेत.

IND vs AUS : त्यांच्याकडे वॉर्नर-स्मिथ तर आपल्याकडेही बुमराह-शमी आहेत, पुजाराने कांगारुंना ललकारले
Follow us on

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia) काही दिवसांपूर्वी सिडनीमध्ये दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे यंदाही कसोटी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार असणार आहे. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी भारताने कांगारुंना धूळ चारली होती, परंतु त्यावेळी कांगारुंचा संघ डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथविना खेळत होता. तेव्हा या दोन्ही खेळाडूंना निलंबित करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाचे हे दोन्ही खेळाडू आता परत आले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. याबाबत टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Puajra) म्हणाला की, सर्वोत्तम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ मागील कसोटी मालिकेतील यशाची पुनरावृत्ती करेल. (IND vs AUS : Cheteshwar Pujara says Smith-Warner presence is challenge But Indian pacers will make History)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील सिरीजमध्ये पुजाराने तीन शतकं ठोकत 500 हून अधिक धावा फटकावल्या होत्या. पुजाराची फलंदाजी आणि भारतीय गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. चेतेश्वर पुजारा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाचा सध्याचा संघ 2018-19 च्या सिरीजमधील संघापेक्षा अधिक मजबूत आहे. कोणालाही विजय सहजासहजी मिळत नाही. भारताचे जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी 2018-19 च्या यशाची पुनरावृत्ती करतील. बुमराह, ईशांत-शमीच्या तिकडीचा सामना करणं कांगारुंसाठी सोपं नसेल”.

पुजारा म्हणाला की, “वॉर्नर, स्मिथ, लॅबुशेन जबरदस्त खेळाडू आहेत. परंतु भारतीय गोलंदाज काही कमी नाहीत. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर यश कसं मिळवायचं हे भारतीय गोलंदाजांना चांगलंच माहीत आहे. भारतीय गोलंदाजांनी यापूर्वीच यशाची चव चाखली आहे. त्यामुळे ते पूर्ण तायरीनिशी आणि मागील अनुभव डोक्यात ठेवून मैदानात उतरतील. आपले गोलंदाज स्मिथ, वॉर्नर, लॅबुशेनला लवकर बाद करु शकतील. आमच्या खेळाडूंनी मागील सिरीजसारखा खेळ केला तर आम्ही पुन्हा एकदा विजयी होवू”.

बुमराहची धमाकेदार कामगिरी

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दौऱ्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानेही प्रत्येकी 16 आणि 11 विकेट्स घेण्याची कामिगरी केली होती. तर फिरकीपटू रवींद्र जडेजाने 2 कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच रवीचंद्रन आश्विन आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने एका सामन्यात अनु्क्रमे 6 आणि 5 खेळाडूंना माघारी पाठवलं होतं.

टीम इंडियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियावर वरचढ

टीम इंडियाचे गोलंदाज मागील कसोटी मालिकेत विकेट्सच्या बाबतीत वरचढ ठरले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजंनी 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 70 विकेट्स घेतल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी 60 विकेट्स घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

India Tour Australia | भारताकडे धुवाँधार बोलर्स, विराट सेनाच विजयी होणार, ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकाचा दावा

India Tour Australia | विराट कोहली क्रिकेट विश्वातील पावरफुल खेळाडू, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराकडून कौतुक

(IND vs AUS : Cheteshwar Pujara says Smith-Warner presence is challenge But Indian pacers will make History)