‘मी विराट कोहलीचे शॉट कॉपी केले’, कांगारूंच्या ‘या’ धडाडीच्या खेळाडूची कबुली

| Updated on: Feb 10, 2023 | 1:51 AM

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचे शॉट मी बॅटिंंग करताना कॉपी करतो, कांगारूंच्या 'या' धडाडीच्या खेळाडूने दिली कबुली

मी विराट कोहलीचे शॉट कॉपी केले, कांगारूंच्या या धडाडीच्या खेळाडूची कबुली
Follow us on

नागपूर : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील नागपूर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अक्षरक्ष: भारतीय फिरकीपटूंच्या तालावर नाचला. भारताचे अव्वल फिरकीपटू असलेल्या रवींद्र जडेजा आणि आर. आश्विन यांनी संघाला ऑल आऊट करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अवघ्या 177 धावांत कांगारूंच्या संघाने आपला गाशा गुंडाळला. ऑसींच्या 7 खेळाडूंना साधा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूने आपण भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचे शॉट खेळल्याचं कबुल केलं.

ऑस्ट्रेलियाच्या 177 धावांमध्ये मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 8 चौकार मारले. त्यासोबतच वेगळेपण दिसून आलं ते म्हणजे काही शॉट्समध्ये, जे लाबुशेन कसोटी क्रिकेटमध्ये कधी खेळताना दिसत नाही. असे शॉट त्याने विराट कोहलीकडून शिकले आहेत. याबद्दल लाबुशेनने सामना संपल्यानंतर एका माध्यमाला बोलताना सांगितलं.

सामन्यामध्ये मी काही शॉट्स खेळलो जे मी विराट कोहलीकडून शिकल्याचं मार्नस लाबुशेन म्हणाला. इतकंच नाहीतर कोहलीनेही मार्नस लाबुशेनच्या कव्हर ड्राईव्हचं कौतुक केलं होतं. कव्हर ड्राईव्ह हा विराट कोहलीचा ट्रेडमार्क शॉट आहे. कोहली खेळत असताना त्याचे चाहते या शॉटची आवर्जून वाट पाहतात.

कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन 49 धावा, स्टीव्ह स्मिथ 37 धावा, अॅलेक्स कॅरी 36 धावा आणि पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा केल्या. बाकी इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. दुसरीकडे भारतीय संघ फलंदाजीला आल्यावर कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. 69 चेंडूत रोहितने 56 धावा केल्या यामध्ये 9 चौकार आणि एक षटकार खेचला.

दरम्यान, भारताकडून दोन खेळाडूंनी कसोटीमध्ये पदार्पण केलं. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि केएस भरत असं या खेळाडूंचं नाव आहे. केएसने खतरनाक मार्नस लाबुशेनला कडक स्टंम्पिंग करत माघारी धाडलं. नेटकऱ्यांनी त्याच्यामध्ये धोनीची चुणूक दिसून आल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.