नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने कांगारूंवर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने घेतलेल्या मोठ्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात अवघ्या ९१ धावांमध्ये कांगारूंचा डाव आटोपला. आर. आश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने नागपूर कसोटी खिशात घालत १-० ने आघाडी घेतली आहे. या आजच्या दिवसाला खेळायला सुरूवात केल्यावर भारताकडून मोहम्मद शमीने एक मोठा पराक्रम केला आहे. भारताने ४०० धावा केल्या यामध्ये शेवटला येत शमीने ३७ धावांची आक्रमक खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली.
मोहम्मद शमीने या खेळीमध्ये ३ षटकार आणि २ चौकार मारले. या खेळीने त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. विराट कोहलीने कसोटीमध्ये 178 डावांमध्ये 24 षटकार ठोकले आहेत, तर मोहम्मद शमीने 85 डावांमध्ये 25 षटकार मारलेत. 2 अर्धशतकांसह शमीने 722 धावा केल्या आहेत. अनेकवेळा भारतासाठी महत्त्वाच्या खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी केली आहे.
कांगारूंना पहिल्या डावामध्ये १७७ धावांच्या आत गुंडाळलं त्यावेळी रविंद्र जडेजाने ५ बळी तर आश्विनने ३ बळी घेतले होते. भारत फलंदाजीला आल्यावर पहिल्या डावामध्ये ४०० धावा केल्या. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक १२० धावा केल्या. त्यासोबतच जडेजा, अक्षर पटेलचं अर्धशतक आणि शमीच्या ३७ धावांच्या जोरावर भारताने आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक ७ बळी घेतले.
कांगारूंना दुसऱ्या डावातही चमक दाखवता आली नाही. आधी जडेजा आणि आज आश्विनच्या फिरकीसमोर त्यांनी नांगी टाकली. आश्विनने उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि एलेक्स कॅरी यांना माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीवर तळ ठोकला होता मात्र त्याला इतर कोणत्या खेळाडूची साथ मिळाली नाही. २५ धावांसह स्मिथ नाबाद राहिला, स्कॉट बोलँडला शमीने पायचित पकडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.