Ind vs Aus Second Test : दिल्ली टेस्टमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटीतही भारताने कांगारूंना पराभवाची धूळ चारली. तीन दिवसातच दुसऱ्या कसोटीचा निकाल लागला असून यामध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी ही कसोटी खास होती. पुजाराचा हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना होता. भारतीय संघाने हा सामना जिंकत त्याची ही कसोटी स्पेशल केली. इतकंच नाहीतर पराभूत झालेल्या कांगारूंच्या संघाने पुजाराला एक खास गिफ्ट दिलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पुजाराला ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सही केलेली एक जर्सी भेट दिली. बीसीसीआयने पॅट कमिन्सचा पुजाराला ही जर्सी देतानाचा फोटो शेअर केला आहे. ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट, पॅट कमिन्स आणि चेतेश्वर पुजारा’, असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
Spirit of Cricket ????
Pat Cummins ? Cheteshwar Pujara
What a special gesture that was! ????#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/3MNcxfhoIQ
— BCCI (@BCCI) February 19, 2023
चेतेश्वर पुजारा 100 व्या कसोटीमधील पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. एकही धाव न काढता तंबूत परतलेला पुजारा दुसऱ्या डावात संघाला विजयी करूनच बाहेर आला. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात 74 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि श्रीकर भरतसोबत भागीदारी केली. आपल्या 100 व्या कसोटीमध्ये विजयी चौकार मारत संघाला विजय साकार करून दिला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच सर्वबाद 263 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने 262 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका धावेची आघाडी होती.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अक्षरश:ढेपाळली. ऑस्ट्रेलियाने 113 धावा आणि 1 धाव मिळून एकूण 114 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 4 गडी गमवून तिसऱ्या दिवशीच पूर्ण केलं. दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा 1 ते 5 मार्च दरम्यान इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.