मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे, कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. यामध्ये अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर काही प्रमुख फलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघात का नाहीत, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कसोटी पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) भारतीय संघात समावेश नसलेला पाहून अनेकांचा हिरमोडही झालाय. पण त्याचा संघात समावेश न करण्यामागचं कारणही निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.
शिखर धवनच्या जागी यापूर्वीही कसोटी संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली होती. तर हार्दिक पंड्या तीनही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा खेळाडू बनलाय. पण दोघेही सध्या पूर्णपणे फिट नसल्याचं कारण एमएसके प्रसाद यांनी दिलंय. हार्दिक पंड्याने विश्वचषकातील सर्व सामने खेळले, पण या काळात त्याला पाठीच्या आजाराचाही त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच त्याला निवडकर्त्यांनी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.
दुसरीकडे पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. पण सराव करतानाच तो दुखापतग्रस्त झाला आणि त्याला परत भारतात पाठवण्यात आलं. त्यानतंर अनेक महिने उलटूनही तो पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. याच कारणामुळे त्याची वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या अनौपचारिक वन डे मालिकेसाठीही निवड करण्यात आली नव्हती.
पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध दणदणीत पदार्पण करत शतकी खेळी केली होती. यानंतर त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धही निवड करण्यात आली. पण त्याला दुखापतीमुळे एकही सामना खेळता आला नाही. मी सध्या पूर्णपणे फिट नसून फिटनेसवर काम करत आहे. पूर्ण फिट कधी होईल सांगता येणार नाही, असं पृथ्वी शॉने गेल्या आठवड्यात म्हटलं होतं.
नियमीत सलामीवीर फलंदाज शिखर धवनलाही कसोटी मालिकेतून वगळण्यात आलंय. त्यामुळे पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत कर्नाटकच्या जोडीवर सलामीची जबाबदारी असेल. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांचा सलामीवीर म्हणून कसोटी संघात समावेश करण्यात आलाय. खराब कामगिरीनतंर पुन्हा एकदा केएल राहुलला संधी देण्यात आल्यामुळे प्रश्नचिन्हही निर्माण करण्यात आलं होतं. पण निवडकर्त्यांनी विद्यमान संघाच्या निवडीचं समर्थन केलंय.
भारतीय संघ (टी-20 मालिका)
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी
भारतीय संघ (वन-डे मालिका)
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
भारतीय संघ (कसोटी मालिका)
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहाणे (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, उमेश यादव
संबंधित बातम्या :