India vs Australia Live Streaming: नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कांगारुंनी भारताला सर्वबाद 250 धावांत रोखलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 251 धावांचं लक्ष्य आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज 116 धावांच्या जोरावर भारताला इथवर मजल मारता आली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वन डे सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताने 48.2 षटकात 250 धावा केल्या.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्याने भारताला जोरदार धक्का बसला. त्यानंतर शिखर धवनही 21 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. अशावेळी कर्णधार कोहलीने अंबाती रायुडूच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रायुडू 18 धावांवर पायचित झाला.
यांनतर विजय शंकर आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. मात्र 46 धावांवर विजय धावबाद झाला. त्यानंतर केदार जाधव (11) आणि महेंद्रसिंह धोनी 0 या दोघांना झाम्पाने सलग दोन चेंडूवर बाद करुन भारताला बॅकफूटवर ढकललं. यानंतर कोहलीने येईल त्या फलंदाजाला साथीला घेऊन आपलं शतक पूर्ण केलं.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खणखीत शतक झळकावलं. कोहलीने एकाकी खिंड लढवत भारताला सव्वा दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळत नसताना, कोहलीने टिच्चून फलंदाजी करुन 107 चेंडूत शतक पूर्ण केलं. कोहलीचं हे वन डेतील 40 वं शतक आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 तर अॅडम झाम्पाने 2 विकेट्स घेतल्या.
Take a bow #KingKohli ??#INDvAUS pic.twitter.com/x5vvfXhA1d
— BCCI (@BCCI) March 5, 2019
पहिल्या सामन्यात 6 विकेट्स राखून दमदार विजय मिळवल्यानंतर, टीम इंडिया आपला विजयरथ कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत बरोबरी साधण्याचा कांगारुंचा इरादा असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या मैदानावर तीन वन डे सामने खेळण्यात आले आहेत. हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. आजचा सामना जिंकून टीम इंडिया विजयी चौकार लगावण्याच्या तयारीत आहे.
भारत :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा
ऑस्ट्रेलिया :
अॅरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शार्ट, शॉन मार्श, मार्कस स्टॉईनिस, उस्मान ख्वाजा, अॅलेक्स केरी, पीटर हँड्सकोंब, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, जेसन बेहरेनडोर्फ, झाय रिचर्डसन, पॅट कमिन्स, एंड्रयू टाय, नाथन कोल्टर नाईल आणि नाथन लायन