मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरु आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्यानंतर भारतानं सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या जोडीनं मैदानात चांगलाचं जम बसवला आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना ड्रॉ च्या दिशेने कुच करत असल्याचं चित्र आहे. असं असलं तरी ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे पुजार-गिल जोडी फोडण्याची एकही संधी सोडत नाही. अशीच एक संधी नाथन लायनच्या गोलंदाजीवर चालून आली. कर्णधार स्टीव्ह स्मिथने क्षणाचाही विचार न करता डीआरएस घेतला.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शुभमन गिल विरोधात एलबीडब्ल्यूची जोरदार अपील करण्यात आली. पंचांना तात्काळ नाबाद असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये पहिल्यांदा पॅडला आणि नंतर बॅटला चेंडू आदळल्याचं दिसून आलं. पण चेंडू हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता, त्यामुळे गिल आऊट होण्याचा प्रश्न नव्हता. पण टीव्ही पंचांनी बॉल ट्रॅकरवर जाण्याचा पर्याय निवडला.
बॉल ट्रॅकरनुसार चेंडू 3 मीटर लांब असूनही लेग स्टंपवर आदळत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर हा निर्णय फिल्डवरील पंचांना सांगण्यात आला. तेव्हा केटलबरोने आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी नाबाद असल्याचं घोषित केलं. रिव्ह्यू वाया गेल्याने लायन, स्मिथ आणि इतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) March 11, 2023
लायननं त्या निर्णयाबाबत पंचांना हसत हसत पुन्हा विचारलं. तेव्हा केटलबरोने हातवारे करत म्हणजे चेंडू खाली जात होता. त्यानंतर स्टिव्ह स्मिथही पुन्हा पंचाकडे येण्याचा प्रयत्नात होता. पण सर्वकाही तिथेच मिटलं आणि सामन्याला सुरुवात झाली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 480 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने सावध सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 74 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मॅथ्यु कुन्हेमनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारल्याने रोहित शर्मा बाद झाला. त्याने 58 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. त्यानंतर पुजारा आणि गिल जोडीने मैदानात चांगलाच जम बसवला. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. गिलनं 194 चेंडूत 101 धावा करत शतक झळकावलं.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.