मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दोन सामने गमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं आहे. तिसऱ्या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित बिघडलं आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात काहीही करून टीम इंडियाला विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा श्रीलंका न्यूझीलंड कसोटी सामन्यावर सर्व गणि अवलंबून असणार आहे. तिसऱ्या कसोटीत बोलायचं झालं तर पराभवामुळे रोहित शर्मा चांगलाच वैतागलेला दिसला. यावेळी त्याने गोलंदाज, फलंदाज या सर्वांची शाळा घेतली. इतकंच काय पत्रकार परिषदेतही त्याने आपला राग व्यक्त केला.
“जेव्हा तुमचा एका कसोटी सामन्यात पराभव होतो, त्यामागे बरीच कारणं असतात. सर्वकाही आपल्याच बाजूने घडेल असं नाही. निश्चितपणे आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली नाही. त्यामुळे धावा किती महत्त्वाच्या आहे, हे कळतं. जेव्हा 80-90 धावांची आघाडी असते तेव्हा तुम्हाला एक डाव खेळण्याचा दबाव असतो. पण आम्ही तसं करू शकलो नाहीत.”, असं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं.
“आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली असती तर निकाल काही वेगळा असता. आम्ही पुढच्या कसोटीबाबत तसा काही विचार केलेला नाही. आताच तिसरा कसोटी सामना संपला आहे. त्यामुळे आम्हाला विचार करण्यासाठी आणखी वेळ लागेल. खेळपट्टी कशीही असो आम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. जेव्हा खेळपट्टी अशी असेल तेव्हा आक्रमक आणि बिनधास्त खेळणं गरजेचं आहे.”, असंही रोहित शर्माने पुढे सांगितलं.
“मला असं वाटतं आम्ही त्यांच्या गोलंदाजांना एकाच ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी प्रवृत्त केलं. याचं संपूर्ण श्रेय लियोनला जातं. जेव्हा एक गोलंदाज ही रणनिती वापरत असेल तर तुम्हाला तुमचा प्लान बदलणं गरजेचं आहे. एक वेगळाच खेळ खेळता येणं गरजेचं आहे. काही जणांनी आता पुढे यावं आणि टीमला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही आमच्या रणनितीत अयशस्वी ठरलो आणि या सामन्यात झालंही तसंच”, असं रोहित शर्मा पुढे म्हणाला.
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी संपूर्ण 109 या धावसंख्येवर तंबूत परतला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 197 धावांची खेळी करत 88 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी गाठतानाच टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत परतला. भारताला अवघ्या 163 धावा करता आल्या आणि विजयासाठी 76 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासाह मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी स्थिती निर्माण केली आहे.