मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिका भारतात सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने संपले असून उर्वरित एका सामन्याची तयारी सुरु आहे. पण ही मालिका सुरु होण्यापूर्वी आणि तीन सामने झाल्यानंतर वाद रंगतो खेळपट्ट्यांचा..ऑस्ट्रेलियाच्या आजी माजी खेळाडूंनी खेळपट्ट्यांबाबत तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर इरफान पठाणनं एक फोटो ट्वीट करत ऑस्ट्रेलियाला खडे बोल सुनावले होते. आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. तिन्ही कसोटी मालिकांचा निर्णय तिसऱ्या दिवशीच लागला. त्यामुळे पुन्हा एकदा खेळपट्ट्यांची चर्चा होऊ लागली आहे. या वादात आता आयसीसीने उडी घेतल्याने माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी खडे बोल सुनावले आहेत.
“खेळपट्टी खुपच ड्राय होती. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी पुरक नव्हती. ही खेळपट्टी फिरकीपटूंच्या बाजूने झुकलेली पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाली. सामना सुरु झाल्यानंतर पाच चेंडूवरच खेळपट्टी उखडण्यास सुरुवात झाली होती. चेंडू सीम होत नव्हता. त्याचबरोबर चेंडू उसळी घेत नव्हता, असं दिसून आलं.”, असं आयसीसी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी सांगितलं.
आयसीसीच्या निरीक्षण समितीने खेळपट्टी सुमार दर्जाची असल्याचा शेरा दिल्यानंतर माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निकालाचं ‘कठोर’ असं त्यांनी वर्णन केलं आहे. तसेच आयसीसीला आरसा दाखवत म्हणाले की, “गेल्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यातील गाबा खेळपट्टीचा काय?”
“मला आठवते की एक कसोटी सामना नोव्हेंबरमध्ये ब्रिस्बेन गाबा येथे झाला होता. तो कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवशी संपला होता. त्या खेळपट्टीबाबत किती विश्लेषण केलं गेलं.तेव्हा सामनाधिकारी कोण होतं?”, असा प्रश्न सुनील गावसकर यांनी उपस्थित केला.
“आयसीसीने मांडलेले तीन मुद्दे खुपच कठोर आहेत. हा या खेळपट्टीवर चेंडू वळत होता. पण त्याने अडचण येण्यासारखं काहीच नव्हतं. जेव्हा ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमवून 77 धावा केल्या तेव्हा खेळपट्टी चांगलीच होती. यात काहीच शंका नाही.”,असं सुनिल गावसकर पुढे म्हणाले.
इंदुरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. आता दुसऱ्या संघासाठी भारत आणि श्रीलंका या दोन संघात चुरस आहे. चौथा सामना भारताने जिंकला तर थेट अंतिम फेरीत धडक असेल. अन्यथा सर्व गणित जर तर वर अवलंबून असेल.