अहमदाबाद : “खेळपट्टीमुळे आम्हाला नीट खेळता आलं नाही. या पीचवर आम्हाला नक्की काय करायचंय, याबाबत माहिती नव्हतं. आम्ही आमची चूक मान्य करतो, असं म्हणत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर पराभवाचं खापर फोडलं आहे. तसेच पुढील सामन्यात आम्ही जोरदार कमॅबॅक करु’, असा आशावादही कोहलीने व्यक्त केला. टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. (india vs england 1st t20i captain virat kohli reaction on pitch)
“आमची फलंदाजी फार वाईट राहिली. आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सत्य परिस्थिती स्वीकारावी लागेल. जर खेळपट्टी पोषक असेल तर तुम्ही पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करु शकता. खेळपट्टी जाणून घेण्यासाठी आम्ही फार वेळ दवडला नाही. मात्र श्रेयस अय्यरने तो प्रयत्न केला. मात्र त्यांनंतरही आम्ही 150 पेक्षा अधिक धावा करु शकलो नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे चढ उतार येतात. आपलं भाग्य जोरदार असतं त्या दिवशी आपण मोठी धावसंख्या उभारतो. पण नेहमीच असं होत नाही”, असंही विराटने स्पष्ट केलं.
आम्ही मागील काही टी 20 मालिका जिंकल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत आम्ही असंख्य प्रयोग करायचे आहेत. पण आम्ही इंग्लंड विरुद्ध कोणत्याही बाबतीत हलक्यात घेण्याची चूक करणार नाहीत,असं विराटने नमूद केलं.
पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी सपशेल निराशा केली. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडले. केएल राहुल, विराट कोहली आणि शिखर धवन या टॉपच्या 3 फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. यामुळे भारताची खराब सुरुवात झाली. मात्र त्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी केली. अय्यरने 67 तर पंतने 21 धावांची खेळी केली. या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले.
हे विजयी आव्हान इंग्लंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान उभय संघातील दुसरा टी 20 सामना 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
(india vs england 1st t20i captain virat kohli on pitch)