चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम टेस्ट सीरिजमधील दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) 13 फेब्रुवारीपासून चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) खेळवण्यात येणार आहे. हा दुसरा सामना टीम इंडियासाठी या मालिकेच्या आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) दृष्टीने महत्वाचा असणार आहे. इंग्लंडने या मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. यामुळे इंग्लंड आघाडी तर टीम इंडिया पिछाडीवर आहे. यामुळे या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे. (india vs england 2nd test match in m a chidambaram stadium chennai preview)
या खेळपट्टीकडून टीम इंडियाच्या फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दिली. टीम इंडिया पहिल्या सामन्यात एकूण 3 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरली होती. यामुळे या दुसऱ्या सामन्यातही 3 फिरकीपटूंना कायम ठेवणार याबाबत काहीच शंका नाही. तसेच रवीचंद्रन अश्विनचा हा होम ग्राऊंड आहे. यामुळे अश्विनकडून या सामन्यात बॅटिंग आणि बोलिंगने चमकदार कामगिरी अपेक्षित असणार आहे.
टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी या सामन्यापेक्षा आणखी चांगली संधी नाही. इंग्लंडने हा सामना जिंकल्यास भारतावर मायभूमीत कसोटी मालिका गमावण्याच संकट आणखी गडद होईल. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा अद्याप भारतात मालिका पराभव झालेला नाही. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी किमान 2 सामने जिंकणं आणि 1 मॅच ड्रॉ राखणं भारतासाठी बंधनकारक आहे. यामुळे विराटच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. तर जेम्स अँडरसनलाही विश्रांती देण्यात आली आहे. आर्चर आणि अँडरसन इंग्लंडचे महत्वाचे गोलंदाज आहेत. हे दोघे नसल्याने टीम इंडियाला थोड्या प्रमाणात दिलासा असणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा पहिल्या सामन्यातील विजयाच शिल्पकार ठरला. त्याने पहिल्या डावात धमाकेदार द्विशतक झळकावलं. तर दुसऱ्या डावातही इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावरच इंग्लंडने मोठ्या फरकाने विजय मिळवला. यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर जो रुट आणि इतर फलंदाजांनाही रोखण्याचं आव्हान असणार आहे.
गेल्या काही सामन्यांपासून सलामीची जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. सलामी जोडीला आश्वासक सुरुवात देण्यास कुठेतरी अपयश येत आहे. शुबमन गिलला चांगली सुरुवात तर मिळतेय. पण त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुंपातर करता येत नाहीये. तर रोहित शर्मा बेजबाबदारपणे खेळत असल्याने तो लवकर बाद होत आहे. पण रोहितला ही चूक सुधरावी लागणार आहे. ही सलामी जोडी दुसऱ्या सामन्यात कशाप्रकारे सुरुवात करतात, याकडे टीम मॅनेजमेंटचे लक्ष असणार आहे.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी एकूण 4 बदल केले आहेत. फास्टर बोलर जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. तर जेम्स अँडरसनलाही वगळण्यात आलं आहे. आर्चर आणि अँडरसनच्या जागी संघात स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सला संधी मिळाली आहे. तर फिरकीपटू डॉम बेसला डच्चू देत मोईन अलीला स्थान देण्यात आलं आहे. तर आक्रमक फलंदाज असलेल्या जोस बटलरलाही वगळण्यात आलं आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी संभावित टीम इंडिया | विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ | जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिबली, रॉरी बर्न्स, डेनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
संबंधित बातम्या :
(india vs england 2nd test match in m a chidambaram stadium chennai preview)