IndvsNZ T20 हॅमिल्टन : सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माच्या धडाकेबाज दोन षटकारांमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात थरारक विजय मिळवला. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी 20 सामना थरारक झाला. दोन्ही संघांनी 20 षटकात 179 धावा केल्याने, हा सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिल मैदानात उतरले. भारताकडून बुमराहच्या हाती सुपर ओव्हरची धुरा सोपवण्यात आली. मात्र विल्यमस आणि गप्टिलने बुमराहच्या खराब चेंडूचा फायदा घेत फटकेबाजी केली. न्यूझीलंड फलंदाजांनी 1 सिक्सर, 2 चौकारांसह 17 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 18 धावांची गरज होती.
#NZvIND 3rd T20: India win the match through super over, take an unassailable lead of 3-0 in the 5-match series. pic.twitter.com/uvUDfBadTA
— ANI (@ANI) January 29, 2020
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी जबरदस्त फलंदाजी करुन, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. न्यूझीलंडकडून अनुभवी गोलंदाज टीम साऊदीने सुपर ओव्हर टाकली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर दोन धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. मग के एल राहुलने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन रोहित शर्माकडे स्ट्राईक दिला. त्यावेळी भारताला दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. रोहित शर्माने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकून अशक्यप्राय वाटणारा विजय सोपा करुन टाकला.
या विजयामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. 5 सामन्यांच्या टी ट्वेण्टी मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माच्या धडाकेबाज 65 धावांच्या जोरावर, भारताने 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही 20 षटकात 6 बाद 179 धावा केल्या. त्यामुळे हा सामना टाय झाला होता.
न्यूझीलंडला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. केन विल्यमसन आणि रॉस टेलर ही अनुभवी जोडी मैदानात होती. मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून, टेलरने सहज विजय मिळवण्याचा इरादा स्पष्ट केला. मात्र मोहम्मद शमीने भेदक मारा करुन, दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं. शेवटच्या चेंडूवर शमीने रॉस टेलरला त्रिफळाचीत केल्याने हा सामना टाय झाला.
त्याआधी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने झोकात सुरुवात करत अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावलं. रोहितने हामिश बेनेटच्या एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा ठोकल्या. रोहितने 40 चेंडूत 65 धावा केल्या. तर के एल राहुल 27 धावा करुन माघारी परतला. कर्णधार कोहलीने 38, श्रेयस अय्यर 17, मनिष पांडे 14 आणि रवींद्र जाडेजाने 10 धावा केल्या. त्यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 179 अशी मजल मारता आली.
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने 48 चेंडूत घणाघाती 95 धावा ठोकल्या. त्याला सलामीवीर गप्टीलने 31 धावा करुन चांगली साथ दिली. मात्र विल्यमसनला आपल्या संघाला विजयी टिळा लावता आला नाही.
रोहित शर्माला पहिल्या दोन्ही टी 20 सामन्यात मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात, रोहित शर्मा चमक दाखवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.