IndvsNz 4th ODI live हॅमिल्टन (न्यूझीलंड): भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना गुरुवारी 31 जानेवारीला हॅमिल्टन इथं होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ही आघाडी कायम ठेवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. भारतीय संघ यावेळी विराट कोहलीऐवजी रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणार आहे. कोहलीला उर्वरित दोन वन डे आणि टी ट्वेण्टी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्याने, टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा रोहितच्या खांद्यावर आहे. रोहित शर्मा उद्या कारकिर्दीतील 200 वा वन डे सामना खेळणार आहे. त्यामुळे सर्वाधिक द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा आपलं अनोखं द्विशतक पूर्ण करेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वा या सामन्याला सुरुवात होईल.
शुभमन गिलला पदार्पण करण्याची शक्यता
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत 19 वर्षाखालील विश्वविजेत्या संघाचा जबरदस्त खेळाडू शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळू शकते. शुभमनने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये तुफान फलंदाजी केली होतीच, शिवाय रणजी सामन्यांमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या. त्यामुळे कोहलीने त्याची तोंडभरुन कौतुक केलं.
धोनीऐवजी कार्तिक?
दरम्यान तिसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला धोनी या सामन्यासाठी तरी उपलब्ध होऊ शकतो का हे पाहावं लागेल. अन्यथा त्याच्याऐवजी कार्तिकच विकेटकीपिंग करु शकतो.
दमदार गोलंदाजी
भारताने तीनही वन डे सामन्यात फलंदाजीतील दम दाखवलाच, शिवाय गोलंदाजांनीही कमाल केली. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या जोडीने न्यूझीलंडला सळो की पळो करुन सोडलं. याशिवाय मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचा वेगवान माराही किवींना हैराण करत आहे.
52 वर्षांनी इतिहास रचणार
भारताने जर 4-0 अशी आघाडी मिळवली, तर भारत 52 वर्षांनी हा नवा विक्रम रचेल. भारताने पहिल्यांदा 1967 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारताने कसोटी मालिका 3-1 (4) ने जिंकली होती. भारताने 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत 3-1 (5) असा विजय मिळवला होता.
संभावित संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन,महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर) /दिनेश कार्तिक, केदार जाधव, अंबाती रायुडू, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.