India vs Australia: आर. अश्विनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची नांगी, पाच गडी केले झटपट बाद

| Updated on: Feb 11, 2023 | 3:16 PM

आर. अश्विननं पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा डावात ऑस्ट्रेलियाला सळो की पळो करून सोडलं. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर आस्ट्रेलियन फलंदाजांचा निभाव लागला नाही. पहिल्या सामन्यात विजयी होत भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

India vs Australia: आर. अश्विनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची नांगी, पाच गडी केले झटपट बाद
India vs Australia: आर. अश्विनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची नांगी, पाच गडी केले झटपट बाद
Follow us on

मुंबई: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. पहिल्या सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. भारताने तिसऱ्या दिवशीच पहिला कसोटी सामना संपवला. चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित होणार आहे. दुसरीकडे, पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकल्याने गुणांमध्येही भारताने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंची जादू दिसून आली. रविंद्र जडेजानंतर आर. अश्विननं पाच गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला दिवसा तारे दाखवले. पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावासाठी सज्ज झाला. मात्र अवघ्या 91 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. आर. अश्विननं 12 षटकात 3 निर्धाव षटकं टाकत 37 धावांवर 5 गडी बाद केले. उस्मान ख्वाजा, डेविड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, पीटर हँडस्कॉम्ब आणि एलेक्स कॅरेला तंबूचा रस्ता दाखवला. आर. आश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला.

अश्विनने पाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दाखवला रस्ता

उस्मान ख्वाजा 5 या धावसंख्येवर असताना आर. अश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर डेविड वॉर्नरला 10 या धावसंख्येवर पायचीत केलं. त्यानंतर मॅथ्यू रेनशॉला पायचीत करत तंबूत पाठवलं. पीटर हँडस्कॉम्बला खेळपट्टीवर टिकूनही दिलं नाही. त्यालाही 6 या धावसंख्येवर असताना पायचीत केलं. त्यानंतर पाचवी विकेट अलेक्स करेची घेतली. 10 या धावसंख्येवर असताना पायचीत केलं आणि तंबूत धाडलं.

भारताची पहिली इनिंग

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 177 धावांच्या पाठलाग करताना रोहित शर्मा आणि केएल राहुल जोडीने सावध सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी 76 धावांची भागीदारी केली. त्यानंतर केएल राहुल 20 धावांवर असताना टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहित शर्मा एका बाजूने खिंड लढवत असताना दुसऱ्या बाजूला अश्विन 23, चेतेश्वर पुजारा 7, विराट कोहली 12, सूर्यकुमार यादव 8 या धावसंख्येवर मैदानात परतले. त्यानंतर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाची जोडी चांगली जमली. सहाव्या गड्यासाठी दोघांनी 61 धावांची भागीदारी केली. मात्र रोहित शर्मा 120 या धावसंख्येवर असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला श्रीकर भारतही झटपट बाद झाला. रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलनं डाव सावरला. सातव्या गड्यासाठी दोघांनी 88 धावांची भागीदारी केली. दोघांनी आपली अर्धशतकं झळकावली. त्यानंतर रविंद्र जडेजा 70, तर अक्षर पटेल 84 धावा करून बाद झाले. मोहम्मद शमीही 37 धावा करून बाद झाला, तर मोहम्मद सिराज नाबाद 1 धावसंख्येवर राहिला. पहिल्या डावात 400 धावा केल्याने भारताकडे 223 धावांची आघाडी होती.

ऑस्ट्रेलियाचा पहिली इनिंग

ऑस्ट्रेलियाकडून एकही खेळाडू खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. पण दुसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रुपाने पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजनं त्याला अवघ्या एका धावेवर पायचीत केलं.त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं डेविड वॉर्नरला बाद केलं. ऑस्ट्रेलियन संघ दबावात असताना मार्सन लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ जोडीनं डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र केएस भारतनं चपळतेने केलेल्या स्टंपिंग करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेला मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. स्टीव स्मिथ 37, एलेक्स कॅरे 36, पॅट कमिन्स 6, टोड मर्फी 0, पीटर हँडस्कॉम्ब 31, स्कॉट बोलँड 1 अशा धावा करून बाद झाले.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.