मुंबई: टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे आयसीसी रँकिंगमध्ये आपलं स्थान भक्कम केलं आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच धरतीवर कसोटी आणि वन डे मालिका पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरी विराट कोहलीच्या टीम इंडियाने केली. त्यामुळे भारतीय संघाचं आयसीसीच्या कसोटी रँकिंगमधील अव्वलस्थान आणखी भक्कम झालं. टीम इंडिया 116 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचं रनमशीन कर्णधार विराट कोहलीही कसोटी फलंदाजांच्या यादीत तब्बल 922 गुणांसह अव्वलस्थानी आहे. कोहलीच्या आसपासही कोणी नाही.
कसोटी फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 897 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच तो कोहलीपासून तब्बल 25 गुण मागे आहे. फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी करणारा भारताचा हुकमी फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर युवा खेळाडू ऋषभ पंतेन आपल्या करियरमधील सर्वोत्तम रँकिंगसोबत 17 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
दुसरीकडे कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कॅगिसो रबाडा पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा अष्टपैली रवीेंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन अनुक्रमे पाचव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 711 गुणांसह 15 व्या स्थानावर आहे.
वाचा : ICC रँकिंग : कसोटी क्रिकेटमधील ‘टॉप 10’ फलंदाज आणि गोलंदाज
दरम्यान, सर्वोत्तम कसोटी संघांमध्ये भारतानंतर दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागतो. आफ्रिका 110 गुणांसह दुसऱ्या तर इंग्लंड 108 गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे.
इंग्लंडला आपला तिसरा क्रमांक कायम ठेवण्यासाठी बुधवारी वेस्ट इंडीज विरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजय मिळवावा लागेल. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातही कसोटी सामने होत असल्यामुळे ते सुद्धा आपलं रँकिंग सुधारण्यासाठी प्रयत्न करतील.
इंग्लंडने जर वेस्ट इंडीजला 3-0 ने क्लीन स्वीप दिली तर त्यांचे 109 गुण होतील. मात्र तरीही इंग्लंड भारत आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा मागे राहतील आणि वेस्ट इंडीज आठव्या स्थानावर राहील.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत काहीही निकाल लागला, तरी हे दोन्ही संघ पाचव्या आणि आठव्या स्थानावर राहतील. जर ऑस्ट्रेलिया 2-0 ने विजयी झाली, तर त्यांना तीन गुण मिळतील आणि त्यांचे 104 गुण होतील. तर श्रीलंकेला दोन गुणांनी नुकसान होईल आणि ते 89 गुणांवर राहतील. जर श्रीलंका 2-0 ने विजयी झाली, तर त्यांचे 95 गुण होतील आणि ते ऑस्ट्रेलियापासून दोन गुणांनी पिछाडीवर राहतील.