कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपमध्ये अक्षरश: खळबळ माजवली आहे. या स्पर्धेत संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने ग्रुप स्टेज आणि नंतर सुपर-8 मध्ये आपले सर्व सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून या टीमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये 27 जून रोजी भारतीय संघाचा इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार असून तो पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक उत्सुक आहेत.
सेमीफायनलमध्ये रिझर्व्ह-डे असेल का?
पण भारत वि. इंग्लंड सामना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची काळजी वाढवणारा एक मुद्दा आहे, तो म्हणजे पाऊस. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर त्या दिवशी पाऊस पडला आणि उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर ? सेमीफायनलमधील या सामन्यासाठी रिझर्व्ह-डे ठेवण्यात आला आहे का ? सामना रद्द झाल्यास भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडेल का ? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याबद्दलच जाणून घेऊया…
या वर्ल्डकपमध्ये एक सस्पेन्स आहे. तो म्हणजे, दुसऱ्या सेमीफायनलसाठी आयसीसीने कोणताही रिझर्व्ह डे (राखीव दिवस)ठेवलेला नाही. पण पहिल्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाऊस पडल्यास रिझर्व्ह डे ऐवजी त्या सामन्यासाठी 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी खेळवला जाईल.
मॅच रद्द झाल्यास पुढे काय ?
27 जून रोजी सेमीफायनलच्या दिवशी गयानामध्ये पावसाची बरीच शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाची सेमीफायनल मॅच पावसामुळे वाहून जाऊ शकते. अशा परिस्थितीत, प्रथम 4 तास 10 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर असे झाले नाही तर ग्रुप स्टेजमध्ये अव्वल असलेल्या संघाला फायदा होईल आणि त्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजे भारतालाच फायदा होईल. भारतीय संघाने सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. तर ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ बाहेर पडेल.
टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुम्राह, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज