नवी दिल्ली: न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वन डे मालिकेतील भारतीय संघाचा सदस्य असलेल्या अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) झटका दिला आहे. रायुडूची गोलंदाजी शैली अयोग्य असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मज्जाव केला आहे. रायुडूला गोलंदाजीपासून निलंबित करण्यात आलं आहे. रायुडूची गोलंदाजी शैली संशयित आढळली होती. त्यामुळे त्याने 14 दिवसांमध्ये गोलंदाजी शैलीची चाचणी देणं आवश्यक होतं. मात्र रायुडूने ती चाचणी न दिल्याने, त्याला निलंबित करण्यात आलं आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, कोणत्याही गोलंदाजाची शैली संशयित आढळल्यास, त्याला 14 दिवसांच्या आत आपल्या बोलिंग अॅक्शनची म्हणजेच गोलंदाजी शैलीची चाचणी द्यावी लागते. याच नियमाच्या आधारी रायुडूला निलंबित करण्यात आलं आहे. जोपर्यंत रायुडू चाचणी देऊन त्यामध्ये पास होत नाही, तोपर्यंत हे निलंबन कायम राहील.
आयसीसीने हा निर्णय जाहीर केला, त्यावेळी रायुडू न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात फलंदाजी करत होता. 33 वर्षीय रायुडूला पहिल्यांदा 13 जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यात गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला हातो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात रायुडूने केलेली गोलंदाजी संशयित आढळली होती. रायुडूने त्यावेळी 2 षटकं गोलंदाजी करत 13 धावा दिल्या होत्या. वन डे इंटरनॅशनलमध्ये रायुडूच्या नावे आतापर्यंत केवळ 3 विकेट्स आहेत. 50 सामन्यांमध्ये केवळ 9 सामन्यातच त्याने गोलंदाजी केली आहे.