हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यात मुंबईचा फलंदाज कायरन पोलार्डने स्फोटक फलंदाजी केली. पण वाईड बॉल न दिल्यामुळे तो संतापला आणि पंचांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्याने बॅट हवेत फेकली. तो जवळपास वाईड लाईजवळ उभा राहिला आणि ड्वेन ब्राव्हो गोलंदाजीसाठी येताच बाजूला झाला. यानंतर त्याला पंचांनी समज दिली.
मुंबई इंडियन्सच्या अखेरच्या षटकात पोलार्ड सातत्याने वाईड लाईनच्या जवळ येत होता. हाच अंदाज घेऊन ब्राव्होनेही वाईड लाईनला लागून तीन चेंडू टाकले आणि यावर पोलार्डला एकही धाव काढता आली नाही. पण एक चेंडू वाईड होता, असं म्हणत पंचांनी योग्य तो निर्णय न दिल्यामुळे पोलार्ड संतापला. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्याने बॅट हवेत फेकलीच, शिवाय तो वाईड लाईनच्या जवळही उभा राहिला.
खेळ भावनेच्या विरोधात वागल्यामुळे स्क्वेअर लेगचे पंच इयान गोल्ड आणि मेनन यांनी पोलार्डला समज दिली. पोलार्डने यावेळी शाब्दिक वाद न घालता वाईड लाईनजवळ खेळणं पसंत केलं. या कृत्यासाठी पोलार्डवर त्याच्या मॅच फीचा 25 टक्के दंड आकारण्यात आलाय.
मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. मुंबईची धावसंख्या 149 पर्यंत नेण्यात पोलार्डने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 25 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या.
VIDEO : पोलार्ड आणि पंचांमध्ये वाद