IPL 2020 | दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ, ऋषभ पंत आणखी काही सामन्यांना मुकणार

| Updated on: Oct 14, 2020 | 5:31 PM

दिल्ली कॅपिटल्स पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणांसह 2 ऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2020 | दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ, ऋषभ पंत आणखी काही सामन्यांना मुकणार
Follow us on

दुबई : दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतला दुखापतीमुळे आणखी काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. ऋषभला मांसपेशीच्या दुखापतीमुळे काही दिवसांआधीच बाहेर बसावे लागले होते. पंतला किमान 7 दिवसांचा आराम करावा लागेल, अशी माहिती कर्णधार श्रेयस अय्यरने दिली होती. मात्र आता पंतला फीट होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहे. त्यामुळे दिल्ली संघाच्या चिंतेत भर पडली आहे. ipl 2020 delhi capitals rishabh pant will miss a few more matches due to injurey

याआधी पंतला दुखापतीमुळे किमान 2 सामने खेळता येणार नव्हते. मात्र आता पंत आणखी किती सामने खेळू शकणार नाही, याबाबत कोणतीही खात्रीलायक माहिती नाही. पंतला दुखापतीमुळे जर आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली, तर दिल्लीसाठी हा मोठा झटका असेल.

दिल्लीमागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल स्पर्धेला मुकावे लागले. तर त्यामागोमाग वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही बरगड्यातील दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे दिल्लीला चांगल्या स्थितीत असतानाही अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने मोठा फटका बसला आहे.

ऋषभ पंतची आयपीएल कारकिर्द

ऋषभ पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 60 सामने खेळले आहेत. यामध्ये पंतने 160 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 907 धावा केल्या. यात 11 अर्धशतक आणि 1 शतकी खेळीच समावेश आहे. 128 नाबाद ही पंतची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी आहे.

पंतऐवजी कोणाला संधी?

पंतच्या जागेवर संघात टीम मॅनेजमेटं शिमरॉन हेटमायर याला संधी देऊ शकते. मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंतच्या जागेवर अॅलेक्स कॅरीला संधी देण्यात आली होती. दरम्यान दिल्ली आज 14 (ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्ध भिडणार आहे. तर आगामी सामना शनिवारी चेन्नईविरुद्ध खेळण्यात येणार आहे.

दिल्लीची दमदार कामगिरी

दिल्लीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांपैकी दिल्लीने 5 सामन्यात विजय मिळवला आहे. यासह दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर शिखर धवन, पृथ्वी शॉ हे फलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे दिल्लीला आयपीएल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे.

संबंधित बातम्या :

लंबी रेस का घोडा, दिग्गज खेळाडूकडून ऋषभ पंतचे कौतुक, म्हणाला….

IPL 2020 | दिल्लीला मोठा झटका, अमित मिश्रानंतर हा अनुभवी खेळाडू स्पर्धेला मुकणार

ipl 2020 delhi capitals rishabh pant will miss a few more matches due to injurey