अबूधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा थरार आजपासून (19 सप्टेंबर) रंगणार आहे. आयपीएलच्या या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी हिटमॅन रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर चेन्नईची जबाबदारी अनुभवी आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी सांभाळणार आहे. (IPL 2020 First Match Mumbai Indians vs Chennai Super Kings)
The #Dream11IPL starts today in UAE with @mipaltan taking on @ChennaiIPL. @ameyatilak has got you covered on our match preview
READ – https://t.co/WkXmVAojrB #MIvCSK pic.twitter.com/W9dJGInRH1
— IndianPremierLeague (@IPL) September 19, 2020
आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पहिला सामना यूएईतील शेख जायद स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील पहिल्या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. यंदाच्या मोसमात आयपीएलच्या सामन्यांची वेळ बदलण्यात आली आहे. या मोसमातील सामन्यांना संध्याकाळी 7.30 पासून सुरुवात होणार आहे. याआधी सामन्यांना 8 वाजता सुरुवात व्हायची. तसेच यंदाच्या मोसमात एकूण 10 डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवशी 2 सामने.
कोरोनामुळे यंदा क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेता येणार नाही. मात्र त्यांना स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) थेट सामने पाहता येणार आहेत. तसेच मोबाईल युझर्सना डिज्नी हॉटस्टार (Disney Hotstar) आणि जिओ अॅपवर (Jio App) लाईव्ह मॅच पाहता येणार आहे.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर सर्वांचीच नजर असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच धोनी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे धोनी कशाप्रकारे खेळतो याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई आपसात एकूण 28 वेळा भिडले आहेत. मुंबईची चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी राहिली आहे. चेन्नई विरुद्धच्या एकूण 28 सामन्यांपैकी 17 सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला आहे. तर चेन्नईला मुंबईविरोधात 11 सामने जिंकण्यास यश आले आहे.
मुंबईचा यूएईमधील रिकॉर्ड अत्यंत निराशाजनक राहिला आहे. मुंबई टीमने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. या पाचही सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नईची यूएईमधील कामगिरी चांगली आहे. चेन्नईने यूएईत खेळलेल्या 5 पैकी 4 सामन्यात विजयश्री पटकावली आहे. तर केवळ एकदाच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
कोरोनामुळे काही नवे नियम करण्यात आले आहेत. तर काही नियमांमध्ये बदलही केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. संसर्गाच्या दृष्टीने मैदानात ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे. फिल्डिंगदरम्यान अनेक खेळाडूंचा बॉलला स्पर्श होतो. यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बॉलला चकाकी मिळावी यासाठी अनेक खेळाडू थूक लावतात. मात्र कोरोनामुळे असं करता येणार नाही. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या खेळाडूला दंड भरावा लागेल. तसेच यावेळेस नो बॉल देण्याचा अधिकार मैदानातील अम्पायरऐवजी थर्ड अम्पायरला असेल.
कोरोनापरिस्थितीमुळे यंदाच्या आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. यूएईमधील अबूधाबी, दुबई आणि शारजाह या तीन स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण 60 साखळी सामने खेळले जाणार आहे.
यूएईमध्ये आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची ही तिसरी वेळ आहे. याआधी 2009 आणि 2014 मध्ये आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं. 2014 मध्ये आयपीएलमधील पहिल्या टप्प्यामधील 20 सामने यूएईत खेळवण्यात आले होते. (IPL 2020 First Match Mumbai Indians vs Chennai Super Kings)
संबंधित बातम्या :
IPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली
IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास