मुंबई : इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) काल (गुरुवारी) किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (Royal Challengers Bangalore) खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाबने बँगलोरचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. बँगलोरने पंजाबसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान पंजाबने 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. मात्र निकोलस पूरनने यजुवेंद्र चहलच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत पंजाबला विजय मिळवून दिला.
पूरनने शेवट जरी केला असला तरी कर्णधार लोकेश राहुल आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल हे दोघे या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. दोघांनी या सामन्यात शानदार अर्धशतकं झळकावली. यंदाच्या आयपीएलमध्ये गेल काल पहिलाच सामना खेळत होता. तरीदेखील गेलने शानदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. पंजाबने या सामन्यात विजय मिळवला असला तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (SachinTendulkar) मात्र पंजाबच्या संघावर नाराज आहे. सचिनने त्याची नाराजी ट्विटरद्वारे व्यक्त केली.
सचिनच्या नाराजीमागचं कारण काय?
सचिन तेंडुलकर पंजाबच्या संघ व्यवस्थापनावर नाराज आहे. यंदाच्या आयपीएलमधील पंजाबचा काल 8 वा सामना होता. परंतु हा ख्रिस गेलचा मात्र पहिलाच सामना होता. या सामन्यात गेलने जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. गेलला पंजाबच्या संघाने मागील 7 सामन्यांमध्ये संघात स्थान का दिले नाही? असा सवाल सचिनने उपस्थित केला आहे. गेल रुग्णालयात उपचार घेत होता. त्यातून बरा होऊन तो परतला आहे. तरीदेखील कालच्या सामन्यात त्याची बॅट तळपली. या सामन्याद्वारे गेलने त्याच्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सचिननेदेखील गेलचे कौतुक केले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाबच्या संघाचं प्रदर्शन वाईट ठरलं आहे. आठ सामन्यांमध्ये पंजाबने आतापर्यंत केवळ दोन विजय मिळवले असून गुणतालिकेत पंजाबचा संघ सर्वात तळाला आहे. पंजाबच्या संघाने गेलला यापूर्वीच संघात स्थान दिले असते तर कदाचित पंजाबने अजून एक-दोन सामने जिंकले असते, असा अंदाज क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
Good to see @henrygayle back and scoring a wonderful 53. Wonder what @lionsdenkxip were thinking by leaving him out all this while. #RCBvKXIP #IPL2020 pic.twitter.com/OeTPWbC5t3
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 15, 2020
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना
बंगळुरुने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय चांगली झाली. के.एल. राहुल आणि मयांक अग्रवालने पंजाबला अतिशय आश्वासक सुरुवात करून दिली. राहुल आणि अग्रवाल यांच्यामध्ये 78 धावांची पार्टनरशीप झाली. त्यानंतर 45 धावांवर असताना चुकीचा फटका मारुन अग्रवाल तंबूत परतला.
त्यानंतर के.एल.राहुलच्या साथीला आलेला किंग बॅट्समन ख्रिस गेलची या मोसमातील ही पहिलीच मॅच होती. सुरुवातीला तो अतिशय सावध पद्धतीने खेळत होता. मात्र त्यानंतर त्याचा जम बसायला सुरुवात झाली. गेलने 45 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने 5 उत्तुंग षटकार ठोकले तर एक चेंडू सीमारेषेपार धाडला. के. एल. राहुलनेदेखील कर्णधारपदाला साजेशी खेळी करत नाबाद 61 धावा काढल्या. त्याच्या या खेळीत 5 षटकारांसह एका चौकाराचा समावेश आहे.
ख्रिस गेल आणि के. एल. राहुल फटकेबाजी करत असताना सामना 19 व्या ओव्हरमध्येच संपेल असं वाटत असताना बंगळुरुच्या गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणली. शेवटचे षटक टाकणाऱ्या चहलने तर कमाल केली. शेवटच्या षटकात केवळ 2 धावा हव्या असतानादेखील त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या षटकात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस गेल धावबाद झाला. त्यामुळे सामन्यात पुन्हा रंगत आली. एका चेंडूत एक धाव हवी असताना निकोलस पूरनने शानदार षटकार ठोकत पंजाबला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकातासमोर मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान
IPL 2020 | दिनेश कार्तिकने KKR चे कर्णधारपद सोडलं, कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे
IPL 2020, RR vs DC | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा बिहू डान्स पाहिलात का ?
(IPL 2020 | RCBvKXIP : Sachin Tendulkar lashes out at Kings XI Punjab )