मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या (IPL 2021) वेळापत्रकाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावेळेस आयपीएलचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अनेक फ्रँचायजी आपल्या टीमच्या चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करायले लागले आहेत. विविध फोटो आणि गिफ फाईल शेअर करुन चाहत्यांचं मनोरंजन करण्यात येत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या ट्विटरवरुन स्टार खेळाडू इशान किशनचा (Ishan Kishan) लहानपणाचा एक फोटो शेअर केला आहे. (IPL 2021 Mumbai Indians are shared cricketer Ishan Kishan childhood photo)
Some habits never change ???#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 pic.twitter.com/b2ECJnvay9
— Mumbai Indians (@mipaltan) March 8, 2021
या फोटोमध्ये इशान किशनच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. या फोटोसोबत गत मोसमातील ट्रॉफीसोबतचा फोटो कोलाज केला आहे. या कोलाज करण्यात आलेल्या फोटोत इशानच्या हातात ट्रॉफी आहे. “काही सवयी कधीच बदलत नाहीत” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. हा फोटो नेटकऱ्यांना चांगलाच पसंतीस पडला आहे.
सिक्स म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतो (Chris Gayle) ख्रिस गेल. गेल आपल्या तडाखेदार खेळीसाठी आणि गगनचुंबी सिक्ससाठी प्रसिद्ध आहे. अशा दिग्गद फलंदाजाला न जमलेली कामगिरी इशानने गेल्या मोसमात केली होती. इशानने गेल्या पर्वात सर्वाधिक सिक्स खेचण्याचा विक्रम केला होता. इशानने या हंगामात एकूण 30 सिक्स लगावले होते.
इशानने 13 व्या मोसमातील 14 सामन्यातील 13 डावात बॅटिंग केली. यामध्ये त्याने 145.76 च्या स्ट्राईक रेटने तसेच 57.33 च्या सरासरीने 13 डावांमध्ये 36 चौकार आणि 30 षटकारांसह 516 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. इशानची 99 ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
इशान किशनचा जन्म 18 जुलै 1998 रोजी बिहारच्या पाटणात झाला. इशान लहानपणापासून क्रिकेटमध्ये माहिर होता. इशानची क्षमता ओळखून त्याच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिला. इशांतने मोठ्या भावाच्या सल्ल्यानुसार क्रिकेट क्लब जॉईन केलं. “इशानची प्रतिभा ही भारतीय संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंह धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू गिलक्रिस्टसारखी आहे”, असं त्याचे कोच संतोष कुमार यांचं म्हणणं आहे.
इशानच्या क्रिकेट करियरमध्ये त्याचे कोच संतोष कुमार यांची भूमिका महत्त्वाची आहे. बीसीसीआयने जेव्हा काही कारणास्तव बिहार क्रिकेट असोसिएशनची मान्यता रद्द केली तेव्हा संतोष कुमार यांनी इशानला दुसऱ्या राज्यात खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर इशान रांची शहरात गेला. त्याने रांचीत मेहनत केली. मेहनतीला फळ मिळालं. इशानची झारखंडच्या रणजी टीमसाठी निवड झाली. रणजी टॉफी स्पर्धेत दिल्लीविरुद्ध इशानने सर्वाधिक 273 धावा केल्या.
इशान किशानला 2016 च्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. या स्पर्धेत इशानने चांगली कामगिरी केली. या कामगिरीच्या आधारावर इशानला 2016 साली आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 2 वर्ष तो गुजरात लॉयन्स संघातून खेळला. त्यानंतरपासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.
दरम्यान आयपीएलआधी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इशानने इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. या टी 20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. 12 मार्चपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. इशानला खेळण्याची संधी मिळाल्यास त्याचं टी 2o पदार्पण ठरेल. त्यामुळे इशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याच्या खेळाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
(IPL 2021 Mumbai Indians are shared cricketer Ishan Kishan childhood photo)